Advertisement

"हे एव्हढं सोपं आहे असं समजू नका"; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख, जयंत पाटलांचा शिंदे गटाला इशारा

Jayant Patil On Shinde Group : 'कधीही निवडणूक लागू शकते, त्यासाठी सज्ज व्हा'; आढावा बैठकीत राजेंद्र शिंगणेची बंडखोर नेत्यांवर टीका
Maharashtra politics : jayant patil, eknath shinde
Maharashtra politics : jayant patil, eknath shinde

-जका खान, बुलढाणा

शिवसेनेविरोधात बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटातील आमदारांवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला. जयंत पाटील यांनी '५० खोके'चा मुद्दाही उपस्थित केला. तसेच ज्यांना बाळासाहेबांनी मंत्री केलं, त्यांनीच त्यांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचलं, असं पाटील म्हणाले. याच बैठकीत माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी बंडखोरांवर निशाणा साधला.

बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंचं नाव घेत जयंत पाटील काय म्हणाले?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी बुलढाणा, मलकापूर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. या बैठकीला राजेंद्र शिंगणेही उपस्थित होते. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, "महाराष्ट्रात जे सरकार स्थापन झालंय, त्यातील कुणीही सुखी आणि समाधानी नाहीये. पानवाले, टपरीवाले, स्कुटरवाले, रिक्षावाले बाळासाहेबांच्या (balasaheb Thackeray) पुण्याईने शून्यातून महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचले. मंत्री झाले. त्या सर्वांनी शिवसेनेकडे पाठ फिरवून शिवसेनेचा मुख्यमंत्री पाडला. बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला (Uddhav thackeray ) पाडलं. त्याला खाली खेचलं. हे महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांच्या मनात घर करून राहणार आहे. हे एव्हढं सोप्प आहे, असं समजू नका", असं म्हणत जयंत पाटील यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.

Maharashtra politics : jayant patil, eknath shinde
शिंदे गटाने शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय नेलं टेंभी नाक्यावर; काय आहे प्रकरण?

'५० खोके, एकदम ओके'वरून शिंदे गटावर शिवसेना आणि महाविकास आघाडीतल्या इतर दोन पक्षांकडून सातत्यानं प्रहार केला जातोय. याच मुद्द्यावर जयंत पाटील यांनी पुन्हा भाष्य केलं. "काही आर्थिक व्यवहार करून हे लोक तिकडे गेलेत का? अशी शंका लोकांना आहे", असं जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटलांनी दिले मध्यावधी निवडणुकीचे संकेत

"या सर्व प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जनता मोठ्या आशेने पाहात आहेत. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात स्पष्ट झाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून राज्यात काम करू शकतो. निवडणूक कधीही लागू शकते. यासाठी आपण सज्ज व्हायला हवे. मला खात्री आहे की, आगामी निवडणुकीत आपल्या जागा दुप्पट होतील. आज विरोधी पक्षात असताना जनतेच्या प्रश्नांवर तडफेने काम करा. लोकांच्या प्रश्नांसाठी आक्रमक व्हा", असं जयंत पाटील पदाधिकाऱ्यांना म्हणाले.

राजेंद्र शिंगणे यांची प्रतापराव जाधव, संजय गायकवाड, संजय रायमुलकर यांच्यावर टीका

बुलढाणा जिल्ह्यातील काही खासदार आणि आमदारांनी बंडखोरी केली. यात बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, आमदार संजय रायमुलकर यांचा समावेश आहे.

बंडानंतर दोन्ही आमदारांनी तत्कालीन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी निधी दिला नसल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर इतर मुद्द्यांवर नाराजी बोलून दाखवली होती. बंडखोर आमदार, खासदारांकडून झालेल्या टीकेला माजी आरोग्यमंत्री राजेंद्र शिंगणेंनी पहिल्यांदाच प्रत्युत्तर दिलं.

Maharashtra politics : jayant patil, eknath shinde
शिवसेनेवर कुरघोडी करण्यासाठी राष्ट्रवादीचा प्लान काय? जयंत पाटील यांनी उघड सांगितला

"यांना पालकमंत्र्यांबद्दल एवढी खुन्नस होती की, सत्ता कुणाची येईल याचं अजिबात घेणं देणं नव्हतं. पालकमंत्री (महाविकास आघाडी सरकारच्या काळात राजेंद्र शिंगणे हे बुलढाण्याचे पालकमंत्री होते.) घरी गेले याचा आनंद त्यांना फार झाला", असं राजेंद्र शिंगणे म्हणाले.

"माझ्यामुळे जिल्ह्यातील दोन आमदार, एक खासदार पक्ष सोडतात, हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ यश आहे. एका पालकमंत्र्यांमुळे तीन जण पक्ष सोडत असतील, तर तो पालकमंत्री किती मोठा असला पाहिजे?", असा टोला राजेंद्र शिंगणे यांनी जाधव, गायकवाड आणि रायमुलकर यांना लगावला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in