छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आणि लोकमान्य टिळकांचा काहीच संबंध नाही-आव्हाड

जितेंद्र आव्हाड यांचं राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याला उत्तर
छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आणि लोकमान्य टिळकांचा काहीच संबंध नाही-आव्हाड

छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधणं लोकमान्य टिळक यांचा काहीही संबंध नाही असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंच्या भाषणातल्या वक्तव्याला उत्तर दिलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद या ठिकाणी सभा घेतली. रविवारी झालेल्या या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आपल्या भाषणात राज ठाकरेंनी छत्रपती शिवरायांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली होती असं म्हटलं होतं. यालाच आता जितेंद्र आव्हाडांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

"छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या समाधीचा शोध आणि त्याचे पूर्ण बांधकाम याबाबतचे सगळे ऐतिहासिक कागदपत्रं उपलब्ध आहेत. त्यावरून हे सिद्ध होतं की लोकमान्य टिळकांनी समाधी बांधण्यासाठी समिती स्थापन केली होती. निधीही जमवला होता पण त्यांनी समाधीचा जीर्णोद्धार केला नाही." असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

इंद्रजीत सावंत या थोर इतिहासकारांनी अनेक गोष्टी संशोधन करून लिहून ठेवल्या आहेत. एवढंच नाही तर शिवरायांच्या जन्माला ३०० वर्षे झाली तेव्हा महाराष्ट्र सरकारने एक पुस्तक काढलं आहे छत्रपतींच्या समाधीबाबत, त्यामध्येही सगळे संदर्भ, पत्र व्यवहार हे लिहून ठेवले आहेत. संदर्भ सापडवून इतिहास लिहिला जातो. कुणा एकाच्या नावावर इतिहास खपवता येत नाही असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

छत्रपती शिवरायांची समाधी बांधणं आणि लोकमान्य टिळकांचा काहीही संबंध नाही. त्यांनी एकही वीट रायगडावर नेली नव्हती. महाराष्ट्राला चुकीचा इतिहास सांगितला गेला आणि राज्याचं वाटोळं करण्यात आलं आहे, असाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंत राव चव्हाण यांनी बाबासाहेब पुरंदरेंना रोखण्याचा प्रयत्न केला होता पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत. यशवंतराव जर यशस्वी झाले असते तर महाराष्ट्रात इतिहासावरून गोंधळ उडाला नसता असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.

माझं हे स्पष्ट मत आहे की कुणीही इतिहासाशी खेळ करू नये. त्यामुळे वेगवेगळे वाद निर्माण होतील आणि महाराष्ट्राला ते सगळं महागात पडेल. आपण राजकारणात आहोत तर मग विकासाचे मुद्दे, इतर समस्या यावर बोललं पाहिजे असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे जे ऐतिहासिक संदर्भ देतात त्यावरच मी बोलतो कारण मला त्यावरून त्यांचं आकलन समजतं असाही टोला आव्हाड यांनी लगावला.

Related Stories

No stories found.