
उत्तर प्रदेशात सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत प्रार्थना स्थळावरील अनधिकृत भोंगे हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. त्याचबरोबर इतर प्रार्थना स्थळांकडून भोंग्यांचा आवाज कमी केला आहे. या निर्णयाबद्दल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उचलून धरला आहे. ३ मे पर्यंत भोंग्यांसंदर्भातील निर्णय घ्यावा, असा अल्टिमेटही राज यांनी राज्य सरकारला दिलेला आहे. भोंगा वाजल्यास त्या मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवू, असा इशारी मनसेकडून दिलेला असून, यावरून वाद विवाद झडत आहे.
दरम्यान, राज्यात हा मुद्दा चर्चेत असतानाच उत्तर प्रदेशातही भोंग्यांच्या मुद्द्याची चर्चा होत आहे. झालं असं की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने उत्तर प्रदेशातील अनधिकृत भोंगे हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. त्याचबरोबर प्रार्थनास्थळांना न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणेच कमी आवाज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
उत्तर प्रदेशात आतापर्यंत १२७ धार्मिक प्रार्थना स्थळांवरील भोंगे हटवण्यात आले आहेत. तर १७ हजारांहून अधिक भोंग्याचा आवाज कमी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या या भूमिकेबद्दल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांचं कौतुक करताना, राज यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. "उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषतः मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचं मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार"
"आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी! महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना," असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशात भोंग्यांचा आवाज झाला कमी
सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश आणि उत्तर प्रदेश सरकारने काढलेल्या आदेशावरून प्रशासनाने अनेक जिल्ह्यात धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवले आहेत. त्याचबरोबर नियमानुसार भोंग्याचा आवाज ठेवण्याच्या सूचनाही केल्या आहेत.
सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात आतापर्यंत १२ विभागात ६,०३१ भोंगे हटवण्यात आले आहेत. त्याचबरोबर २९ हजार ६७४ धार्मिक स्थळांवरील भोंग्याचा आवाज नियमानुसार ठरवून दिला गेला आहे.
मंदिरांवरील भोंगेही हटवले
उत्तर प्रदेशात धार्मिक स्थळांवरील कारवाई करताना मंदिर, मशिदींवरील भोंगे हटवण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशात श्री कृष्ण जन्मभूमी येथील भोंगेही हटवण्यात आले आहेत. मंदिर परिसरात असलेल्या भागवत भवन येथील कळसावर भोंगे लावलेले होते. इथे एक ते दीड तास मंगलाचरण आणि विष्णू सहस्त्रनाम वाजवलं जातं. हे आता थांबवण्यात आलं आहे.
गोरखनाथ मंदिरातील भोंग्याचा आवाज कमी
श्री कृष्ण जन्मभूमी मंदिरातील भोंगे हटवण्यात आले, तर गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिर परिसरातील भोंग्यांचा आवाज कमी करण्यात आला आहे. याशिवाय कानपूर, लखनऊ, नोएडा आणि अन्य शहरांतील धार्मिक स्थळांवरील भोंगेही हटवण्यात आले आहेत. तर इतर भोंग्याचा आवाज उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कमी करण्यात आला आहे.