
Sharad Pawar Speech: मुंबई: 'जर अद्यापही राज्यकर्त्यांनी धडा घेतला नाही तर पुढचा कार्यक्रम आपण एकत्र बसून करु आणि त्यांना उलथून कसं टाकायचं याचा विचार करु.' असं खुलं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलं आहे. सत्ताधाऱ्यांकडून महापुरुषांबात केल्या जाणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने (mahavikas aghadi) मुंबईत महामोर्चाचं आयोजन केलं होतं. याच मोर्चात भाषण करताना शरद पवार यांनी राज्यपाल कोश्यारी आणि भाजपवर तुफान हल्ला चढवला. (mahamorcha sharad pawar gave an open challenge to shinde fadnavis governemnt over governor koshyari)
महाविकास आघाडीचे सगळे दिग्गज नेते हे यावेळी रस्त्यावर उतरुन मोर्चात सहभागी झाले आणि नंतर ते सभास्थळी पोहचले. पण शरद पवारांचं वय आणि प्रकृती यामुळे त्यांनी मोर्चात न जाता सरळ सभास्थळ गाठलं. मात्र, यावेळी पवारांनी आपल्या भाषणातून मोर्चेकऱ्यांनी सरकारविरोधात कठोर भूमिका घ्यावी असं आवाहन केलं. पाहा शरद यावेळी नेमकं काय म्हणाले:
'70 वर्षांपूर्वी संयुक्त महाराष्ट्रासाठी या मुंबई नगरीत लाखोंचे मोर्चे निघाले होते. मराठी भाषिकांचं राज्य व्हावं यासाठी अनेक तरुण पुढे आले होते. घरादाराचा विचार केला नाही, महाराष्ट्राचा विचार केला आणि शेवटी महाराष्ट्र पदरात पडला. पण तरीही अजूनही महाराष्ट्रात मराठी भाषिक जे महाराष्ट्राच्या बाहेर आहेत ते महाराष्ट्रात येण्याचा प्रयत्न सातत्याने करतायेत. मग ते बेळगावचा मराठी माणूस असेल, निपाणीचा असेल किंवा अन्य भागातील असेल. त्या सगळ्यांचा महाराष्ट्रात समावेश व्हावा यासाठी त्यांची जी भावना आहे त्यात भावनेशी महाराष्ट्रातील मराठी माणूस अंतकरणापासून सहभागी आहे.'
'आज लाखोंच्या संख्येने हे तरुण एकत्र का आले? तर आज महाराष्ट्राचा जो सन्मान आहे त्याला धक्के बसू लागले आहेत. त्याला हादरे बसू लागले आहेत. आज ज्यांच्या हातात राज्याची सूत्र आहेत. त्या सत्तेत बसलेले लोक महाराष्ट्राच्या दैवत आणि आदर्श पुरुषांबाबत एक वेगळी भाषा वापरतात.'
'या देशात अनेक राजे-रजवाडे होऊन गेले. पण साडेतीनशे वर्ष झाली तरीही सामान्य माणसाच्या मनात एक नाव कायम राहिलं आणि ते म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे शिवछत्रपती.'
'शिवाजी महाराजांच्याबाबत उल्लेख राज्याचा मंत्री करतो. पण महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नाही. यासंबंधीची तीव्र भावनाचा व्यक्त करण्यासाठी लाखोंच्या संख्येने इकडे तुम्ही जमा झाले आहेत.'
'आज तुम्ही इशारा दिला. पण या इशाऱ्यातून राज्यकर्त्यांनी बोध घेतला नाही. तर लोकशाहीच्या मार्गाने त्यांना काय धडा शिकवायचा आहे हे दाखवून दिल्याशिवाय महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही. याच्याबद्दलची खात्री मला स्वत:ला आहे.'
'महाराष्ट्राची काही सन्मान चिन्ह आहेत. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील असोत ही आमची आजही सन्मानाची स्थानं आहेत. आजचे राजकर्ते याच महापुरुषांबाबत काहीही बोलतात.'
'महाराष्ट्राच्या इतिहासात असा राज्यपाल कधीही पाहिला नाही. मी स्वत: महाराष्ट्राच्या विधानसभेत जाऊन 55 वर्ष झाली. त्या 55 वर्षांच्या काळात अनेक राज्यपाल पाहिले. अनेकांची नावं असतील ज्यांनी महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविण्याचं काम या लोकांनी केलं आहे.'
'पण या वेळेला एक अशी व्यक्ती या ठिकाणी आणली की, जी व्यक्ती एकंदरीत महाराष्ट्राच्या विचारधारेला संकटात नेण्याचं काम करते.'
'महात्मा फुले, सावित्राबाई फुले यांच्याबाबत बाष्कळ असे उद्गार राज्यापाल काढतात. त्यांना शरम वाटली पाहिजे. कारण महात्मा फुले या देशामध्ये सामान्य माणसाला संघटीत करण्यासाठी आधुनिक विचार देण्यासाठी, स्त्री शिक्षण असो याबाबत पुढाकार घेणारा थोर नेता म्हणून महात्मा फुलेंचं नाव सबंध देशात घेतलं जातं.'
'ज्या व्यक्तीने ज्ञानदानाबाबत मोठं काम केलं आहे त्या व्यक्तीबाबत टिंगल टवाळी ही राज्यपालांकडून केली जात असेल तर राज्यपाल म्हणून त्यांना राहण्याचा अधिकार नाही.'
'त्यामुळेच केंद्र सरकारने लोकशाहीनुसार राज्यपालांची हकालपट्टी लवकरात लवकर करावी. ही हकालपट्टी वेळेत केली नाही तर हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. त्याचं प्रतिक आज या ठिकाणी आलेले हे मोर्चातील लाखो लोक आहेत.'
'सध्या महाराष्ट्राच्या बदनामीची स्पर्धाच लागली आहे. एका मंत्र्याने उल्लेख केला की, कोणी शिक्षणासाठी मदत मागत असेल. तर अशा लोकांसाठी मंत्र्याने असं म्हटलं की, तुम्ही भीक मागता.'
'मला ठावूक आहे की, कर्मवीर भाऊराव पाटलांनी साताऱ्याला एक कॉलेज काढलं. त्या कॉलेजला शिवाजी महाराजांचं नाव दिलं. एके दिवशी एक धनाढ्य माणूस त्यांच्याकडे आला. तो भाऊरावांना म्हणाला की, मी तुम्हाला प्रचंड देणगी देतो. फक्त एकच काम करावं तुम्ही की, या कॉलेजला माझं नाव द्यावं. यावर भाऊराव म्हणाले की, एकवेळ माझ्या बापाचं नाव बदलेन पण शिवाजी महाराजांचं नाव काढणार नाही.'
'आज त्याच भाऊरावांसंबंधींचा उल्लेख भीक मागता म्हणून करता. कर्मवीरांनी आपल्या आयुष्यात लाखो विद्यार्थी शिकवले. त्यांच्या घरात एकेकाळी अन्न नव्हतं. ते अन्न मिळविण्यासाठी त्यांनी खबरदारी घेतली. पण त्यांनी कुणाची लाचारी पत्करली नाही.'
'आज रयत शिक्षण संस्थेत चार लाख विद्यार्थी शिकत आहेत. त्यामुळे हे दालन त्यांनी उपेक्षित मुला-मुलींसाठी सुरु केलं आहे. अशा कर्मवीरांबाबत कुणीतरी गलिच्छ शब्द वापरत असतील तर अशा लोकांना धडा शिकवायचं काम तुम्हा-आम्हाला करावं लागेल.'
'मला आनंद आहे की, आज या ठिकाणी आपली विचारधारा वेगळी असेल. पण महाराष्ट्राच्या भल्यासाठी, सन्मानासाठी, स्वाभिमानासाठी हजारोंच्या संख्येने संयमाने आणि शिस्तीने तुम्ही या ठिकाणी आलात. माझी अशीच अपेक्षा आहे की, या मोर्च्यातून राजकर्ते धडा घेतील.'
'जर तरीही राज्यकर्त्यांनी धडा घेतला नाही तर पुढचा कार्यक्रम आपण एकत्र बसून करु आणि त्यांना उलथून कसं टाकायचं याचा विचार करु. एवढंच मी आपल्याला सांगतो.' असं थेट आव्हान शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिलं आहे.