
मंत्रिमंडळ विस्तार लांबत असलेल्या शिंदे गट आणि अपक्षांमधील वाढत चाललेली धुसफूस लवकरच थांबण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार शिंदे-फडणवीस सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. महिनाअखेरीस वा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो अशी सुत्रांची माहिती आहे.
टीव्ही9 ने सुत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून अनेक नेते मंत्री होण्यासाठी आसुसलेले असल्याचं दिसून आलं आहे. अनेक नेत्यांची नाराजी अनेकवेळा समोरही आलीये. पहिल्या मंत्रिमंडळात अनेकांना संधी न मिळाल्यानं आता दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता होती. मात्र, आता जानेवारी महिन्याच्या अखेरीस वा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनीही याबद्दल संकेत दिले होते.
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी करताना भोंडेकर यांनी तारखेचा उल्लेख केला होता. मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे), उपमुख्यमंत्र्यांनी (देवेंद्र फडणवीस) विस्तार करणं अपेक्षित आहे. 26 जानेवारीच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल", असं भोंडेकर म्हणाले होते.
त्यात आता सुत्रांनी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती दिलीये. मिळालेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळात 22 जागा असून, 10 मंत्र्यांचाच शपथविधी होणार आहे. 10 मंत्र्यांमध्ये 2 कॅबिनेट आणि 8 राज्यमंत्र्यांचा समावेश असणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्ताने एकनाथ शिंदेंसमोर मोठा पेच असणार आहे. कारण शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. इतकंच नाही, तर काही अपक्षही मंत्रिपदासाठी इच्छुक आहे. जर 10 जणांचा शपथविधी होणार असेल, तर संधी कुणाला द्यायची हा मोठा पेच शिंदेंसमोर असणार आहे.
शिंदे गटात मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांमध्ये संजय शिरसाट, भरत गोगावले, योगेश कदम, प्रताप सरनाईक, संजय गायकवाड, चिमणराव पाटील, सुहास कांदे आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांची नावं आहेत.
दुसरीकडे भाजपमधून संजय कुटे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, राम शिंदे, नितेश राणे, देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास कुणाला संधी मिळणार, याकडे सगळ्यांच्याच नजरा असणार आहे.