Maharashtra: छत्रपती संभाजीनगरातील हिंसा राजकीय की धार्मिक? काय आहे थेअरी?
छत्रपती संभाजीनगरमधील हिंसाचाराबाबत अनेक शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत. सोबतच पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT

छत्रपती संभाजीनगर : राम नवमी उत्सवाची तयारी सुरू असतानाच झालेल्या हिंसाचारानंतर छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) परिस्थिती आता पूर्वपदावर येत आहे. पोलीस प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. शहारातील चौका-चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हिंदु-मुस्लीम समुदायांमध्ये शांतता समितीच्या बैठका सुरु आहेत. (Chhatrapati Sambhajinagar Violence Incident political or religious?)
अशात आता झालेल्या या हिंसाचारानंतर छत्रपती संभाजीनगरमधील घटनेबाबत अनेक शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत. सोबतच पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. हा हिंसाचार राजकीय होता की धार्मिक आणि दोन समुदायांमधील होता? असा सवाल विचारण्यात येत आहे.
हेही वाचा : नाशिक : काळाराम मंदिरात संयोगिता राजेंसोबत घडला धक्कादायक प्रकार
काय आहेत शक्यता?
छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत सध्या दोन शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत. पहिली शक्यता अशी की, राम मंदिराबाहेर काही समाज विघातक घटकांमध्ये एका छोट्या कारणावरुन भांडण झालं, पण वादातून सुरू झालेल्या भांडणाचं रुपांतर हिंसाचारात झालं, काही हिंसक घटकांनी या प्रकरणाला धर्माशी जोडलं आणि नंतर दंगलखोरांच्या जमावाने हल्ला केला.
दुसरी शक्यता अशी की, औरंगाबादच्या नामांतराविरोधात खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली 15 दिवसांपासून आंदोलन सुरू होते. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी हिंदू संघटनांनी संभाजीनगर नावाच्या बाजूने रॅली काढली होती, त्यादरम्यान औरंगाबाद नावाचा फलक काढून टाकण्यात आला होता, त्यामुळे हिंसाचारामागे हेही कारण असू शकते.