'शिवशक्ती-भीमशक्ती'ला आंबेडकरांचा होकार; ठाकरेंची भूमिका काय? 'वंचित'कडून विचारणा

सुभाष देसाई- प्रकाश आंबेडकर यांच्या दोन वेळा बैठका झाल्या. चर्चा सकारात्मक
Uddhav Thackeray - Prakash Ambedkar
Uddhav Thackeray - Prakash Ambedkar Mumbai Tak

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून चर्चा असलेल्या वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना (ठाकरे गट) आघाडी होणार यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. या आघाडीची सकारात्मक चर्चा झाली आहे. तसंच या आघाडीसाठी आम्ही आमचा होकार कळवला आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी दिली. त्या मंगळवारी माध्यमांशी बोलत होत्या.

रेखा ठाकूर म्हणाल्या, वंचित बहुजन आघाडी-शिवसेना (ठाकरे गट) आघाडीची चर्चा सुरु आहे. या बाबतीत वंचित बहुजन आघाडीच्या बाजुने आम्ही आमचा होकार कळवला आहे. आमच्या वतीने पक्षाचे राज्य कमिटीचे सदस्य महेंद्र रोकडे, मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन आणि वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांची शिवसेना (ठाकरे गट) नेते सुभाष देसाई आणि त्यांच्या काही खासदारांसोबत दोन बैठका झाल्या आहेत. त्यात युती संबंधी  सकारात्मक चर्चा झाली.

सुभाष देसाई आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचीही भेट झाली आहे त्यांच्यातही दोन बैठका झाल्या असुन आघाडीसंबंधी सकारात्मक चर्चा झाली आहे. पण आम्ही शिवसेनेला हे स्पष्ट करण्यास सांगितले की, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग असणार की शिवसेना (ठाकरे गट)-वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र निवडणुका लढविणार हे स्पष्ट करायला सांगण्यात आले आहे. या बाबतीतला निर्णय त्यांच्याकडून समजला की पुढच्या टप्प्याची चर्चा सुरु होईल, अशीही माहिती रेखा ठाकूर यांनी दिली.

उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर एका व्यासपीठावर

शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे काही दिवसांपूर्वी एकाच व्यासपीठावर आले होते. प्रबोधनकार.कॉम' या संकेतस्थळाच्या लॉंचिंग कार्यक्रमानिमित्त हे दोन्ही एकत्र दिसून आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी त्यांच्या भाषणांमधून आगामी काळात शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीचे संकेत दिले होते.

उद्धव ठाकरे म्हणाले होते, आज मला आनंद आहे, अभिमान आहे. असं काही नाही की माझी आणि प्रकाशजींची ओळख नाही. बोलतो. मध्ये-मध्ये भेटलेलोही आहे. पण त्यांच्यासोबत भेटायचं म्हणजे वेळ काढून भेटायला पाहिजे. कारण माहिती आणि ज्ञान याचा धबधबा याला मिनिटांचं गणित नाही.

आमच्या दोघांचं वैचारिक व्यासपीठ एकच :

आज पहिल्यांदा एका व्यासपीठावर आलो आहोत. पण वैचारिक व्यासपीठ आमच्या दोघांचही एकचं आहे. ते एक असल्यामुळे आम्हाला दोघांनाही एकत्र येण्यात अडचण आली नाही, आणि ज्याची अपेक्षा लोकांना आहे, तशी ती येणारही नाही. दोन्ही विचारांचे वारसे एकत्र घेऊन चाललो आहोत.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in