नाईक, साळवी, देशमुख... ३ महिन्यात ठाकरेंचा तिसरा आमदार रडारवर

Maharashtra Politics : राज्याचं राजकारण पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांनी ढवळून निघणार?
Vaibhav Naik - Rajan Salvi - Nitin Deshmukh
Vaibhav Naik - Rajan Salvi - Nitin DeshmukhMumbai Tak

(Maharashtra Politics)

अकोला : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आणखी एक आमदार चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची चिन्ह आहेत. अकोला जिल्ह्यातील बाळापुरचे आमदार नितिन देशमुख यांना लाच-लुचपत विभागाने चौकशीसाठी आणि जबाबासाठी हजर राहण्यासंबंधी नोटीस बजावली आहे. या नोटिसीप्रमाणे १७ जानेवारीला देशमुखांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परीक्षेत्र, अमरावती येथे उपस्थित राण्याबाबत सुचना देण्यात आली आहे. यावेळी सोबत मालमत्ता विवरणही सादर करण्यास सांगण्यात आलं आहे.

नितीन देशमुख हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निष्ठावंत आमदार म्हणून ओळखले जातात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला साथ न देता गुवाहटीच्या रस्त्यातून नितीन देशमुख पळून आले होते. शिंदे गटाने सुरतला पळवून नेत गुवाहटीला जाण्यासाठी दबाव आणला, मात्र मी तिथून पळून आल्याचं नितीन देशमुख यांनी सांगितलं होतं. 

राजन साळवींचीही सुरु आहे चौकशी :

दरम्यान, नितीन देशमुख यांच्यापूर्वी डिसेंबर महिन्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे राजापूरचे आमदार आणि उपनेते राजन साळवीही लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आले आहेत. आमदार साळवींना रायगड लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाकडून मालमत्तेच्या चौकशी संदर्भात नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार ते चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयात हजरही झाले होते.

वैभव नाईक यांचीही सुरु आहे चौकशी :

आमदार साळवी यांच्यापूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनाही बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात नोटीस देण्यात आली आहे. ऐन दिवळीत देण्यात आलेल्या नोटिसीमुळे राज्याचं राजकारण चांगलचं तापलं होतं. त्यांच्याविरोधातील या प्रकरणात सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चौकशी सुरू आहे.

कोकणातून शिवसेनेचे ९ पैकी ३ तर उर्वरित महाराष्ट्रातील १६ पैकी १३ आमदार उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले आहेत. बाकी सर्वांनी मुख्यमंत्री शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. याच एकनिष्ठ राहिलेल्या आमदारांमध्ये आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी आणि आमदार नितीन देशमुख यांचा समावेश आहे. हे तिघेही मागच्या तीन महिन्यात चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in