
शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे. गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीवेळी ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. त्यानंतर दादर पोलीस ठाण्याच्या आवारात गोळीबार करण्यात आला होता. सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप असून, बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालात ही गोळी सरवणकर यांच्या बंदूकीतील असल्याचं म्हटलं आहे.
'लोकमत'ने पोलिसांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. सप्टेंबर 2022 मध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीच्या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. प्रभादेवी जंक्शन येथे झालेल्या वादानंतर पुन्हा जोरदार राडा झाला होता. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं.
दादर पोलीस ठाण्याच्या आवारात दोन्ही गटाचे कार्यकर्ते जमलेले असताना सदा सरवणकर यांनी गोळी झाडल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी सदा सरवणकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती.
या प्रकरणी पोलिसांनी आमदार सदा सरवणकर यांच्यासह इतर लोकांविरुद्ध आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला होता. दुसरीकडे सदा सरवणकर यांनी गोळी झाडल्याचा आरोप फेटाळून लावला होता.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केलेलं काडतूस आणि सदा सरवणकर यांची रिव्हॉल्व्हर तपासणीसाठी कलिना येथील फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेत पाठवली होती. त्याचबरोबर सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार पोलिसांचा तपास सुरू होता. त्यात आता बॅलेस्टिक अहवालाने सदा सरवणकरांच्या अडचणी वाढल्या आहेत.
पोलिसांनी तपासणीसाठी पाठवलेल्या काडतूस आणि रिव्हॉल्व्हरचा तपासणी अहवाल पोलिसांना मिळाला आहे. जप्त करण्यात आलेलं काडतूस आणि सदा सरवणकर यांच्या बंदुकीचे नमुने जुळले आहेत. त्यामुळे दादर पोलीस ठाण्याबाहेर झाडण्यात आलेली ती गोळी सदा सरवणकर यांच्या बंदुकीतील असल्याचं बॅलेस्टिक अहवालातून स्पष्ट झालं आहे. याला दादर पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. त्यामुळे सदा सरवणकर अडचणीत येण्याची शक्यता वाढलीये.