"शिवसेनेतल्या फुटीला फक्त उद्धव ठाकरेच जबाबदार": देवेंद्र फडणवीस

वाचा सविस्तर बातमी काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी?
Only Uddhav Thackeray is responsible for the split in Shiv Sena Says Devendra Fadnavis
Only Uddhav Thackeray is responsible for the split in Shiv Sena Says Devendra Fadnavis

शिवसेनेतल्या फुटीला उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्रात जो सत्ताबदल झाला त्यात माझीही भूमिका होतीच. कारण आमच्या पाठीत शिवसेनेने खंजीर खुपसला. त्यांनी अनेक गोष्टी अशा केल्या ज्यामुळे शिवसेना फुटली. त्या फुटीला उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी ह वक्तव्य केलं आहे.

काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी?

महाराष्ट्रात जो सत्ताबदल झाला आहे त्याबाबत मी इतकंच सांगेन की मी चाणक्य वगैरे नाही. मात्र यात माझी भूमिका होती. केंद्रातल्या नेत्यांची मला या सगळ्या बदलांमध्ये साथ मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आशीर्वाद आम्हाला होताच. तसंच या सगळ्यात महत्त्वाची भूमिका होती ती अमित शाह यांची. जे लोक आमच्यासोबत आले त्यांच्या मनात हा विश्वास आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच देश पुढे जाईल.

चाणक्य वगैरे राहुद्यात पण मला वाटतं की मला हा प्रश्न विचारण्यात आला की राजकीय परिस्थितीसाठी कोण जबाबदार आहे ? तर या सगळ्याचं क्रेडिट जातं ते उद्धव ठाकरे यांनाच. कारण त्यांनी जर आमच्याशी युती तोडली नसती. त्यांच्या पक्षात ते सर्वाधिक नाकारले गेले. शिवसेनेत काम करत असताना त्यांच्यासोबतच्या आमदारांना वाटत होतं की आमचं अस्तित्व काय? बाळासाहेब ठाकरे आयुष्यभर काँग्रेसच्या विरोधात लढत होते. त्याच काँग्रेससोबत मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे सत्तेत बसले. ही बाब अनेकांना पटली नाही. त्यामुळेच त्यांनी जी परिस्थिती शिवसेनेत निर्माण केली त्यामुळेच शिवसेना फुटली.

बाळासाहेब ठाकरेंना जनाब बाळासाहेब ठाकरे म्हटलं गेलं

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात जनाब बाळासाहेब ठाकरे म्हटलं गेलं. तसंच उर्दूत कँलेंडर्सही छापण्यात आली. या आणि अशा सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे उद्धव ठाकरेंना त्यांच्या पक्षातले लोक कंटाळले असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंच्या भरवशावर आणि त्यांच्या खांद्यावर बसून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वाढू लागली होती. त्यामुळे त्याचा फायदा आम्ही घेतला. जे काही झालं ते एका दिवसात तयार झालेलं नाही. ज्या आमदारांवर अन्याय झाला तो त्यांना असह्य झाला तेव्हा ते आमच्यासोबत आले. धनुष्यबाण मी नाही तर उद्धव ठाकरेंनीच तोडला आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. News 18 ग्रुपला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी हे भाष्य केलं आहे.

एकनाथ शिंदेंना सोबत घेताना काय घडलं? काय म्हटले देवेंद्र फडणवीस?

एकनाथ शिंदे आणि तुमची चर्चा सुरू आहे ते कुणालाच कळलं कसं नाही? असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले. राजकारणात अशा गोष्टी होत असतात. उद्धव ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा काय म्हणायचे? मी आव्हान देतो सरकार पाडून दाखवा, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा. उद्धव ठाकरे हे वारंवार हे म्हणायचे. त्यानंतर मी एकदाच उत्तर दिलं होतं. की तुम्ही कितीही म्हणत असलात तरीही ज्यादिवशी सरकार पडेल ना? तुम्हाला कळणारही नाही. तसंच घडलं. ज्यादिवशी ४० आमदार नाकाखालून निघून गेले तरीही उद्धव ठाकरेंना कळलं नाही.

एक गोष्ट पक्की आहे की ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला त्याचवेळी हे ठरवलं होतं की याचं उत्तर आम्ही देणार. त्या उत्तराची पद्धत काय ते ठरलेलं नाही. मात्र आम्ही वेळ आल्यावर उत्तर दिलं असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in