Pratap Sarnaik: "मुख्यमंत्र्यांनी मला ९०० खोके दिलेत, पण..."

जाणून घ्या प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलता असताना काय वक्तव्य केलं आहे?
Pratap Sarnaik Taunts Uddhav Thackeray Saying That Cm Shinde Given 1800 Crores Fund For Development Thane
Pratap Sarnaik Taunts Uddhav Thackeray Saying That Cm Shinde Given 1800 Crores Fund For Development Thane

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या ४० आमदारांनी बंड केलं. त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला. एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्यासोबतच्या ४० आमदारांवर टीका करताना ५० खोके एकदम ओके या घोषणा महाविकास आघाडीने शिंदे सरकारविरोधात दिल्या. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हेदेखील खोके सरकार असाच उल्लेख कायम करतात. अशात शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला ९०० खोके दिले आहेत पण ते विकासकामांसाठी दिलेत असं म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे प्रताप सरनाईक यांनी?

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व सक्षम आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील विकासकामांसाठी १८०० कोटी रूपयांचा निधी देऊ केला. त्यापैकी ९०० कोटींचा निधी हा ओवळा माजिवाडा मतदार संघातील विकासकामांसाठी आहे तर उर्वरित ९०० कोटींचा निधी मतदारसंघ वगळून महापालिका क्षेत्रातील उर्वरित भागांसाठी आहे. या निधीमुळे रस्ते, सुशोभीकरण आणि इतर कामं केली जाणार आहेत असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

प्रताप सरनाईक यांचा उद्धव ठाकरेंना टोला

यापूर्वी आम्हाला निधी मागावा लागत होता. मात्र आता समोरून निधी मिळतो आहे असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते निधी देत नसत अशी तक्रार असायची. त्या तक्रारीवरूनच हा टोला प्रताप सरनाईक यांनी लगावला आहे.

२६ तारखेला आम्ही गुवाहाटीला जाणार

एवढंच नाही तर प्रताप सरनाईक म्हणाले की गुवाहाटीला गेलो तेव्हा आम्ही कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं. मनातल्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर दर्शनासाठी येऊ असं साकडंही घातलं होतं. आमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या आहेत त्यामुळे २६ नोव्हेंबरला आम्ही गुवाहाटीला जाणार आहोत असंही प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं. एवढंच नाही तर मंत्रिमंडळ विस्तारही लवकरच होईल आणि त्यात कुणाला मंत्रिपद तर पालकमंत्रीपद मिळेल, याबाबत काय योग्य तो निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असंही प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

२१ जून २०२२ ला राज्यात मोठं बंड झालं. शिवसेनेत या बंडामुळे मोठी फूट पडली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांना सातत्याने खोके सरकार चिडवलं जातं आहे. त्यावरून आरोप-प्रत्यारोपही होत असतात. मात्र आता प्रताप सरनाईक यांनी ९०० खोके मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत आणि ते विकासकामांसाठी आहेत असं म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in