राजस्थान काँग्रेसचा संघर्ष हाताबाहेर..., हायकमांड, गहलोत आणि पायलट यांच्याकडे कोणते पर्याय?

राजस्थानमध्ये राजकीय नाट्य सुरूच आहे.
राजस्थान काँग्रेसचा संघर्ष हाताबाहेर..., हायकमांड, गहलोत आणि पायलट यांच्याकडे कोणते पर्याय?

राजस्थानमध्ये राजकीय नाट्य सुरूच आहे. राजीनामे सादर करणाऱ्या गहलोत गटातील आमदारांनी काही अटी काँग्रेस हायकमांडने निरीक्षक म्हणून पाठवलेल्या मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन यांच्यासमोर ठेवल्या व त्यांना भेटण्यास नकार दिला. मात्र, पक्षश्रेष्ठींनी या अटी मान्य केल्या नाहीत. अशा स्थितीत मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन हे अशोक गहलोत यांची भेट घेऊन आज दिल्लीत परततील आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना संपूर्ण राजकीय परिस्थितीची माहिती देतील. अशा स्थितीत राजस्थानमध्ये काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशोक गहलोत पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री कोण होणार? गांधी परिवार, अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यासमोर कोणते पर्याय उरले आहेत.

गांधी घराण्यासमोर पर्याय काय?

पहिला- राजस्थानमधील राजकीय संकट संपवण्यासाठी गांधी परिवारासमोर पहिला पर्याय म्हणजे अशोक गहलोत यांना नाराज आमदारांना सचिन पायलट यांना पाठिंबा देण्यास सांगणे. मात्र, गहलोत हे मान्य करतीय याची शक्यता कमी आहे.

दुसरा - गांधी परिवाराकडे दुसरा पर्याय आहे की सीपी जोशी यांना मुख्यमंत्री, दोतसारा यांना उपमुख्यमंत्री आणि सचिन पायलट यांना प्रदेशाध्यक्ष बनवावे. मात्र, पायलट या सूत्रावर आक्षेप घेऊ शकतात.

तिसरा- अशोक गहलोत यांना मुख्यमंत्रीपदी ठेवावे, तर पायलट यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष करावे. मात्र, काँग्रेसने आखलेल्या या रणनीतीवर नव्याने काम करावे लागणार आहे.

चौथा- बंडखोरांवर व्हीप जारी करुन पायलट यांना थेट समर्थन देण्याचे आदेश दिले जातील. मात्र, अशा कृत्यामुळे काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे.

पाचवा- केंद्राच्या राजकारणात पायलट यांना बोलावले जाण्याची शक्यता आहे. मात्र, ही भूमिकाही पायलट यांना मान्य नसणार आहे.

अशोक गहलोत यांच्यासमोर काय पर्याय?

पहिला- गहलोत यांच्याकडे स्वतः पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा आणि पायलट यांना मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा देण्याचा पर्याय आहे. मात्र गहलोत यासाठी तयार नाहीत.

दुसरा- गांधी परिवाराशी बोलून जोशी यांना मुख्यमंत्री आणि पायलट यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यासाठी राजी करण्याचा पर्याय असणार आहे. परंतु सचिन पायलट यांना हे मान्य नसेल.

पायलट यांच्याकडे काय पर्याय आहेत?

पहिला- पायलट यांच्याकडे राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष होण्याचा पर्याय आहे. त्याचबरोबर जोशींना मुख्यमंत्री बनवण्यास सहमती देणे. मात्र, पायलट त्यास अनुकूल असल्याचे दिसत नाही.

दुसरा- पक्षाचे हायकमांड काय निर्णय घेते याची वाट पाहावी. अशोक गहलोत आमदारांना पायलट यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी राजी करतील. मात्र, गहलोत असे करतील याची शक्यता कमी आहे.

तिसरा - काँग्रेस सोडून, स्वतःचा पक्ष काढणे किंवा इतर पक्षात जाणे. मात्र, राजस्थानमध्ये मुख्य लढत दोन पक्षांमध्येच आहे. अशा स्थितीत नव्या पक्षाचा मार्गही सोपा नाही.

कोणता गट शक्तिशाली आहे?

राजस्थानमध्ये काँग्रेसचे एकूण 108 आमदार आहेत. अशोक गहलोत यांच्या गटात 82 आमदार असल्याचा दावा करत आहेत. त्यातील अनेक काँग्रेसशी एकनिष्ठ असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत गहलोत कॅम्पमध्ये 30-40 आमदार, पायलट कॅम्पमध्ये 18-20 आमदार आहेत. 60 ते 70 आमदार पक्ष हायकमांडच्या निर्णयासोबत जाऊ शकतात.

राजस्थानमध्ये राजकीय संकट कसे उभे राहिले?

अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर गहलोत जर अध्यक्ष झाले तर त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल, अशी अटकळ बांधली जात होती. काँग्रेसने काही काळापूर्वी उदयपूरमध्ये झालेल्या बैठकीत एका व्यक्तीला एकच पद देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, याबाबत गहलोत यांना विचारले असता, कोणताही आमदार, मंत्री अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवू शकतो, असे उत्तर त्यांनी दिले. ही खुली निवडणूक आहे, त्यात विजयी झाल्यानंतरही ते मंत्रीपदीस कायम राहू शकतात. 'एक व्यक्ती, एक पद' हा नियम केवळ नामनिर्देशित पदांसाठी आहे, असे ते म्हणाले आहेत.

यानंतर सोनिया गांधी आणि अशोक गहलोत यांची भेट झाली. त्यामध्ये सोनिया गांधी यांनी अशोक गहलोत यांना सांगितले की, पक्षाध्यक्षपदाच्या निवडणूकीत मी 'तटस्थ' राहणार आहे. मी कोणत्याही एका उमेदवाराला पाठिंबा देणार नाही. त्याचबरोबर अशोक गहलोत अध्यक्ष झाल्यानंतर पुढील वाटचालीबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्या म्हणाल्या होत्या. तसेच राहुल गांधी यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले होते की, उदयपूरमध्ये एका व्यक्तीकडे एकच पद असेल, असा निर्णय आम्ही घेतला आहे. मला वाटते याचे प्रत्येकजण पालन करतील असेही राहुल म्हणाले होते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in