मुंबई महापालिका निवडणुकीत स्वत: शरद पवार घालणार लक्ष, राष्ट्रवादीच्या बैठकीत काय ठरलं?

Sharad Pawar राज्यात आगामी काळात महापालिकेच्या निवडणुका (Mumbai Municipal Corporation Election) होणार आहेत. राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत स्वत: शरद पवार घालणार लक्ष, राष्ट्रवादीच्या बैठकीत काय ठरलं?

मुंबई: राज्यात आगामी काळात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. शिवसेनेत उभी फूट पडलेली असतानाही शिवसेना मुंबई महापालिकेत (BMC Election) स्वबळावर लढण्याचा विचार करत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसही (NCP) मोठ्या ताकदीनं निवडणूक रिंगणात उतरणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीची सुत्र खुद्द शरद पवारांनी (Sharad Pawar) आपल्या हाती घेतली आहेत. शरद पवार स्वतः मुंबईत पक्षाच्या प्रचारासाठी उतरणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

कोणता पक्ष सोबत येईल, नाही येईल याचा विचार न करता कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे पवारांनी आदेश दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या बैठकीत आगामी निवडणुकांसंबंधी रणनिती ठरवण्यात आली आहे. मुंबई महापालिकेसाठी सर्व ठिकाणी तयारी करण्याचे आदेशही पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. प्रत्येक वॉर्डमधील परिस्थितीचा अहवाल शरद पवारांना द्यावा लागणार आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत स्वतः आपण लक्ष देणार असल्याचं आश्वासन शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहे. राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीत शरद पवारांनी नवाब मलिकांच्या नावाचाही उल्लेख केला असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईत नवाब मलिक यांनी विरोधकांच्या विरोधात आवाज उठवला म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. परंतु अद्याप त्यांच्या विरोधात ठोस पुरावे सादर होऊ शकले नाहीत असे शरद पवार म्हणाले.

राज्यात सध्या महाविकास आघाडी आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी मित्रपक्षाच्या रुपात आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोबत लढणार की स्वबळावर याबाबत कोणी भूमिका मांडलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी बाबत या महिन्यात भूमिका स्पष्ट करणार आहे. संपूर्ण दिवस मुंबईतील कार्यकर्त्यांना वेळ देणार तसेच चहा, नाश्ताही कार्यकर्त्यांच्या घरातच करणार असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in