प्रकाश आंबेडकरांचं कौतुक, भाजपवर टीका : उद्धव ठाकरेंकडून शिवशक्ती-भीमशक्ती युतीचे संकेत

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावर
Uddhav Thackeray - Prakash Ambedkar
Uddhav Thackeray - Prakash Ambedkar Mumbai Tak

मुंबई : प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी जर समाजाला जागं केलं नसतं तर या समाजाला मान-सन्मान मिळाला नसता. बाबासाहेब होते म्हणून ही एक समानता तयार झाली. एक-एक करत आज आपल्या स्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे. काल-परवा एक वाद उठला. आज पूर्ण स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे. त्यामुळे हे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी जे जे सोबत येतील त्यांच्यासोबत आम्ही जाणार, असं म्हणतं शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी काळात वंचित बहुजन आघाडीसोबत युतीचे संकेत दिले.

मागील अनेक दिवसांपासून शिवसेना (ठाकरे गट) - वंचित बहुजन आघाडी युतीची चर्चा सुरु आहे. याबाबत स्वतः वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपण उद्धव ठाकरे यांना प्रस्ताव पाठविला असल्याचं सांगितलं आहे. अशातच 'प्रबोधनकार.कॉम' या संकेतस्थळाच्या लॉंचिंग कार्यक्रमात आज उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावर आले होते.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आतापर्यंत शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली गेली. आजही तशीच सुरुवात झाली. पण आज याला एक कौटुंबिक रुप आलं आहे. दोन नातू एकत्र आले आहेत.

उद्धव ठाकरेंकडून प्रकाश आंबेडकरांचे कौतुक :

काही वर्षांपूर्वी कलिना इथे एक कार्यक्रम झाला होता. त्यात रामदास आठवले माझ्यासोबत होते. ते मला म्हणाले होते, उद्धवजी तुम्ही प्रबोधनकारांचे नातू आणि आम्ही वैचारिक नातू. म्हटलं असं असेल तर नातू-ना मी असं कशाला. चला एकत्र येऊ. आज मला आनंद आहे, अभिमान आहे. असं काही नाही की माझी आणि प्रकाशजींची ओळख नाही. बोलतो. मध्ये-मध्ये भेटलेलोही आहे. पण त्यांच्यासोबत भेटायचं म्हणजे वेळ काढून भेटायला पाहिजे. कारण माहिती आणि ज्ञान याचा धबधबा याला मिनिटांचं गणित नाही.

आमच्या दोघांचं वैचारिक व्यासपीठ एकच :

आज पहिल्यांदा एका व्यासपीठावर आलो आहोत. पण वैचारिक व्यासपीठ आमच्या दोघांचही एकचं आहे. ते एक असल्यामुळे आम्हाला दोघांनाही एकत्र येण्यात अडचण आली नाही, आणि ज्याची अपेक्षा लोकांना आहे, तशी ती येणारही नाही. दोन्ही विचारांचे वारसे एकत्र घेऊन चाललो आहोत.

हेच आमचं हिंदुत्व आहे :

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी धर्माचं भांडणं यावरही भाष्य केलं. धर्मातील धर्मात जे भांडण होतं ते मुळामध्ये ते त्या धर्मामध्ये माणसाला माणूस म्हणून जगू न देण्यामुळे झालं होतं. माणूसचं आहे. माणूसकी हा सर्वात मोठा धर्म आहे. मग सांगायाचं झालं की, मगाशी मनुस्मृतीचा उल्लेख आला. मग चातुर्वर्णीय आला. चातुवर्णीय म्हणजे काय? डोकं म्हणजे ब्राम्हण, हात म्हणजे क्षत्रिय, धड म्हणजे वैश्य, पाय म्हणजे क्षुद्र.

असा एकदा विषय बाळासाहेबांसमोर आला. ते म्हणाले चातुवर्णीय म्हणजे काय रे? मग जेव्हा आरोग्यासाठी डॉक्टर शीर्षासन करायला सांगतात तेव्हा आपले पाय कुठं जातात? डोकं कुठे जातं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे, कोणत्याही चांगल्या कार्याला निघताना घरच्या वडीलधाऱ्यांच्या डोक्याला हात लावत नाही. पायाला का हात लावतो ना? आता ही शिकवण आमच्या रक्तात भिनली आहे आणि तेच आमचं हिंदुत्व आहे.

स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी जे जे सोबत येतील त्यांच्यासोबत आम्ही जाणार :

देशासाठी प्रबोधनकार आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी जर समाजाला जागं केलं नसतं तर या समाजाला मान-सन्मान मिळाला नसता. बाबासाहेब होते म्हणून ही एक समानता तयार झाली. एक-एक करत आज आपल्या स्वातंत्र्यावर घाला घातला जातोय. काल-परवा एक वाद उठला. आज पूर्ण स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे. त्यामुळे हे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी जे जे सोबत येतील त्यांच्यासोबत आम्ही जाणार.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, आपण मनुस्मृतीमध्ये मनूच्या कायद्यामध्ये अडकून पडणार आहोत की नवं काही घडवणार आहोत? याचा विचार केला पाहिजे. एका बाजूला वैदिक परंपरा आणि दुसऱ्या बाजूला संतांची परंपरा उभी आहे. एका बाजूला विवाह आणि दुसऱ्या बाजूला पुनर्विवाह आहे. वैदिक धर्म म्हणजे विधवांचं मुंडण करणारा, पण दुसऱ्या बाजूला संत परंपरा म्हणजे विधवांचे पुनर्विवाह करणारा, त्यामुळे आपण काय निवडायचं ते ठरवायला हवं. प्रबोधनकारांचा इतिहास बारकाईने केला असता त्यांनी वैदिक परंपरेवर आसूड ओढला आहे. उद्याच्या भवितव्याचा विचार करायचा असता हा धर्म सार्वजनिक कसा होईल याचा विचार केला.

महात्मा फुले, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तिघांनीही धर्म नाकारला नाही. त्यांच्याही मते धर्म आवश्यक आहे. पण त्याच्या अधिन जाऊ नये अशी त्यांची शिकवण होती. त्याचं धर्माशी नव्हे, सामाजिक व्यवस्थेशी भांडण होतं. त्यांनी सामाजिक सुधारणांसाठी प्रयत्न केला. त्याचवेळी आपण समता आणि बंधुभावाचा बळी दिला त्यामुळे राष्ट्र म्हणून उभं राहू शकलो नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. तसंच आता धर्मावर आधारित विचारसरणी पुढे नेण्यात अर्थ नाही, असंही त्यांनी मत व्यक्त केलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in