ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी कोकणात राजकारण तापलं : शिवसेनेच्या बॅनरवर शिंदे समर्थकांचे फोटो

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रत्नागिरी : शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज (शुक्रवारी) कोकण दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वीच कुरघोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. ठाकरे यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर झळकले आहेत. मात्र काही बॅनरवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या फोटोमध्ये शिंदे गटाच्या समर्थकांचे फोटो लागल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. तर आम्ही सर्व शिवसेनेतच आहोत हे दाखविण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका शिंदे गटाच्या समर्थकांनी केला आहे.

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर प्रथमच आदित्य ठाकरे निष्ठायात्रेच्या निमित्ताने रत्नागिरीत आहेत. रत्नागिरी, चिपळूण आणि दापोली या आमदार फुटलेल्या भागात त्यांची सभा होणार आहे. रत्नागिरीतील सभा मुख्य असून ती भव्य करण्याचा आणि त्यातून शक्तिप्रदर्शन करण्याचा इरादा शिवसेनेचा आहे. साळवी स्टॉप येथील जलतरण तलावासमोर होणारी सभा आहे. या सभेसाठी रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि जिल्ह्याच्या अन्य तालुक्यांतून सुमारे १५ हजार कार्यकर्ते दाखल होतील, असा दावा उपनेते आमदार राजन साळवी यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या याच दौऱ्याच्या स्वागतासाठी मोठमोठे बॅनर झळकले आहेत; त्यापैकी काही बॅनरवरून राजकीय चर्चेला उधाण आले आहे. शहराच्या प्रवेशद्वाराजवळ सेनेकडून एक बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत शिंदे समर्थकांचेही फोटो दिसून येत आहेत. या बॅनरवर रोशन फाळके, विकास सावंत, वसंत पाटील, विकास पाटील, जितू शेट्ये आणि नायर यांचे फोटो आहेत. मात्र हे सर्वजण उदय सामंत समर्थक असल्याचा दावा माजी नगराध्यक्ष रोशन फाळके यांनी केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तर हा बॅनर शिवसेनेकडूनच लावण्यात आल्याचं तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी म्हटलं आहे. सोबतच आम्ही सर्व शिवसेनेतच आहोत हे दाखविण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका रोशन फाळके यांनी केली. परंतु आम्ही सर्व मंत्री उदय सामंत आणि भैय्या सामंत समर्थक आहोत, असेही फाळके यांनी स्पष्ट केले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT