दसरा मेळावा : शिंंदेंच्या शिवसैनिकांसाठी प्रताप सरनाईकांकडून शाही मेजवानीची व्यवस्था

बीकेसी मैदानावर येणाऱ्या सर्व शिवसैनिकांची खाण्याची जबाबदारी आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे.
Pratap Sarnaik
Pratap Sarnaik Mumbai Tak

मुंबई : सध्याच्या घडीला राजकीय वर्तूळात चर्चा आहे ती मुंबई होणाऱ्या दोन दसरा मेळाव्यांची. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे होत आहेत आणि त्यामुळेच राज्यातलं राजकारण तापलं आहे. दरम्यान, बंडानंतरही शिवसैनिक आपल्याच मागे आहे हे सांगण्यासाठी शिंदे शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे. शिंदे गटाकडून कमीत कमी 3 लाख कार्यकर्ते येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

कार्यकर्त्यांची नीट काळजी घेण्याची निर्देश :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या येणाऱ्या 3 लाख कार्यकर्त्यांची नीट काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. जे कार्यकर्ते येतील त्यांची जेवणाची, पाण्याची आणि वॅाशरुमची सर्व व्यवस्था नीट झाली पाहिजे. हे कार्यकर्ते आपल्यासाठी येत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, अशा स्पष्ट सुचना सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर दसरा मेळव्यासाठी बीकेसी मैदानावर येणाऱ्या सर्व शिवसैनिकांची खाण्याची जबाबदारी शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे देण्यात आली आहे. जबाबदारी मिळाल्यानंतर प्रताप सरनाईकही कामाला लागले असून त्यांनी 2 ते अडीच लाख कार्यकर्त्यांसाठी चविष्ट पदार्थांच्या मेजवानीचा बेत आखला आहे.

शाही मेजवानीची व्यवस्था :

सरनाईक यांनी ठाण्यातील प्रसिद्ध उद्योजक प्रशांत सपकांळ यांच्या प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या दुकानाला 2 ते अडीच लाख फूड पॅकेट्सची ऑर्डर दिली आहे. खिचडी, वडापाव, समोसा असे पदार्थ न देता, चविष्ट पदार्थांची ऑर्डर दिली आहे. या फूड पॅकेट्समध्ये धपाटे, ठेपला, कचोरी, गुलाबजाम असे चविष्ट पदार्थ असणार आहेत. प्रत्येक शिवसैनिकाला मैदानावर मेळावा संपल्यानंतर हे फूड पॅकेट्स दिले जाणार आहेत.

प्रताप सरनाईक म्हणाले, दसरा मेळाव्यासाठी ग्रामीण भागातून आणि तळागाळातून शिवसैनिक येणार आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये अशी भूमिका एकनाथ शिंदे यांची आहे. शिवसैनिकांना जेवणाची अडचण येऊ नये यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. एका पिशवीमध्ये 50 फूड पॅकेट्स ठेवण्यात येणार आहेत. ही एक एक पिशवी कार्यक्रम संपल्यानंतर प्रत्येक बसमध्ये देण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in