Gulabrao Patil : "आदित्य ठाकरे गेल्या अडीच वर्षात कधीही..."

गुलाबराव पाटील यांची आदित्य ठाकरेंवर घणाघाती टीका
 Shivsena rebel mla gulabrao patil Reaction on aaditya thackeray maharashtra visit shivsanvad yatra
Shivsena rebel mla gulabrao patil Reaction on aaditya thackeray maharashtra visit shivsanvad yatra

शिवसेनेचे नेते आणि बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. आदित्य ठाकरे आज महाराष्ट्र दौऱ्यासाठी का बाहेर पडले आहेत? मागच्या अडीच वर्षात शिवसेना भवनाची पायरीही चढले नाहीत. आताच पळापळ का करत आहेत? असे प्रश्न गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केले आहेत.

गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर काय टीका केली ?

मागच्या अडीच वर्षात आदित्य ठाकरे कधीही शिवसेना भवनाची पायरीही चढले नाहीत. आता महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. आता पळापळ करून काय होणार आहे? यापूर्वी आम्ही हेच सांगत होतो की तुम्ही बाहेर पडलं पाहिजे. तुम्ही ३० वर्षांचे तरूण आहात. उद्धव ठाकरे यांची प्रकृती चांगली असली किंवा कोरोना काळ असला तरीही राज्यभर पायाला भिंगरी लावून फिरत आहात. तसंच फिरायला हवं होतं असं आमचं म्हणणं होतं. हे गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय.

८० वर्षांचे शरद पवार तीन वेळा जळगाव दौऱ्यावर आले होते. अजित पवार जळगाव जिल्ह्यात येऊन गेले. धनंजय मुंडे यांनीही दौरे केले. मात्र आदित्य ठाकरे बाहेर पडत नव्हते. मी सभागृहातही ही खंत बोलून दाखवली होती. असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

गद्दारांनी राजीनामा द्यावा आणि निवडून यावं असं आता आदित्य ठाकरे सांगत आहेत. आम्ही राजीनामा द्यायचा काही संबंधच येत नाही आम्ही धनुष्यबाण चिन्ह निवडून त्यावर निवडून आलोय. धनुष्यबाण म्हणजे शिवसेना आणि आम्ही शिवसेना सोडलेली नाही त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही हे गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय.

मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हा प्रश्न विचारला असता गुलाबराव पाटील म्हणाले की मंत्रिपदं सोडून आम्ही इथे आलो आहोत. आता मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? याचा कोणताही विचार आम्ही केलेला नाही. मंत्रिमंडळ विस्तार जेव्हा व्हायचा तेव्हा होईल असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

आठ मंत्र्यांनी राजीनामा दिला ही घटना देशाच्या राजकारणात पहिल्यांदाच घडली आहे. मंत्रिपदं आल्यावर सोडा साधं सरपंचपद सोडत नाहीत आम्ही मंत्रिपदं सोडून दिली आहेत. याचाच अर्थ धनुष्य-बाण वाचवायचा होता. शिवसेना वाचवायची होती त्यामुळे आम्ही हे पाऊल उचललं आहे असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in