डिसले गुरुजींना अडचणीत आणणारे किरण लोहार ACB च्या जाळ्यात; २५ हजार घेताना रंगेहाथ अटक

किरण लोहार यांना कालच वरिष्ठ मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.
Ranjitsinha Disale
Ranjitsinha DisaleMumbai Tak

सोलापूर : जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. सोमवारी संध्याकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक संजीव पाटील यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, तक्रारदार यांनी त्यांच्या शिक्षण संस्थेत आठवी ते दहावी वर्गवाढ करण्यासाठी अर्ज दिला होते. यु डाईस प्रणालीमध्ये याची नोंदणी करण्यासाठीचा प्रस्ताव इथून पुण्याला शिक्षण सहसंचालकांकडे पाठविण्यासाठी किरण लोहार यांनी ५० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

यानंतर तक्रारदार व्यक्ती आणि किरण लोहार यांच्यात तडजोडी झाली. लोहार यांनी पंचवीस हजार रुपये स्वीकारण्यास मान्यता दर्शविली. याबाबतची तक्रार मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक महाडिक आणि पोलीस निरीक्षक कोळी यांनी पडताळणी केली. यात लाचेची मागणी झाल्याचं समोर आलं. यानंतर तक्रारदार व्यक्तीकडून प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना २५ हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक केली, असंही उपाधीक्षक संजीव पाटील यांनी सांगितलं.

किरण लोहार रणजीतसिंह डिसले यांच्या प्रकरणात आले होते चर्चेत :

ग्लोबल टीचर अॅवॉर्ड विजेते रणजीतसिंह डिसले गुरुजी यांच्यावर काही महिन्यापूर्वी लोहार यांनी गंभीर आरोप केले, तेव्हा ते चर्चेत आले होते. हे प्रकरण डिसले गुरुजींच्या राजीनाम्यापर्यंत गेले होते. अखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात मध्यस्थी करावी लागली होती. लोहार यांची कारकीर्द कोल्हापुरामध्येही काहीशी वादग्रस्त ठरली होती. विशेष म्हणजे किरण लोहार यांना वरिष्ठ मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन कालच सन्मानित करण्यात आलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in