राहुल गांधींनी माफी मागण्यात वाईट काय? आशिष देशमुखांचे खरमरीत उत्तर
काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी कारणे दाखवा नोटीसला उत्तर देताना महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT

काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना कानपिचक्या लगावल्या आहेत. राहुल गांधींनी ओबीसी समुदायाची माफी मागावी असं विधान आशिष देशमुख यांनी केलं होतं. याच प्रकरणात आशिष देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. या नोटिशीला उत्तर देताना देशमुख यांनी पुन्हा एकदा उलट सवाल केला आहे. पक्ष वाईट अवस्थेतून जात असताना महाराष्ट्रातील काँग्रेस नेते गटबाजी करण्यात आनंद मानत आहे, असे खडेबोल देशमुखांनी सुनावले आहेत.
आशिष देशमुख यांनी शिस्तभंग समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांना उत्तर पाठवलं आहे. यात देशमुख म्हणतात, “मला देण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटिसमध्ये दोन मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे राहुल गांधींना दिलेल्या सल्ल्याबद्दलचा आहे. मी राहुल गांधी यांना ओबीसी समाजाची माफी मागण्याचा सल्ला दिला होता. याचा योग्य अर्थ लावण्यासाठी संदर्भ समजून घेण्याची गरज आहे. मोदी आडनावाच्या व्यक्तींबद्दल राहुल गांधींनी विधान केलं होतं. त्यामुळे त्यांना 2 वर्षांची शिक्षा दिली आणि त्यामुळे त्याची खासदारकी रद्द करण्यात आली.”
राहुल गांधींनी माफी मागण्यात वाईट काय? आशिष देशमुखांचा सवाल
आशिष देशमुख पत्रात म्हणतात, “राहुल गांधींनी संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला, असा अर्थ लावला जात आहे. माझा सल्ला पक्ष हितासाठी होता. ओबीसी समुदायात काँग्रेसविरुद्ध कुठली भावना असेल, तर माफी मागून संपवली जावी. माझा सल्ला तथ्यावर आधारित आहे. भारतात ओबीसींची सख्या एकूण लोकसंख्येपैकी 54 टक्के आहे. काँग्रेसने नेहमी ओबीसींचं समर्थन केलं आहे. अशात जर या समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर माफी मागण्यात वाईट काय?”, असं देशमुख यांनी म्हटलं आहे.
“चौकीदार चौर है प्रकरणात राहुल गांधींनी माफी मागितली आहे. त्यांनी राफेल प्रकरणातही 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयात बिनशर्थ माफी मागितली आहे. आताचं प्रकरण लवकर संपावं म्हणून मी माफी दिली. पक्षाला मजबूत करण्यासाठी ओबीसींना सोबत घ्यायला हवं”, अशी भूमिका आशिष देशमुख यांनी पत्रात मांडली आहे.