शरद पवारांना आंदोलनस्थळी जाण्यापासून का अडवण्यात आलं?
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार आंदोलनस्थळी जाण्यासाठी पोहोचले. मात्र, सुरक्षा व्यवस्था आणि पोलिसांच्या बंदोबस्तामुळे त्यांना काही काळ पुढे जाण्यापासून रोखण्यात आल्याची घटना घडली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शरद पवार जंतर-मंतरवर
आंदोलनस्थळी जाण्यापासून का अडवण्यात आलं?
Sharad Pawar Delhi Protest : दिल्लीत विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी भेट देऊन आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला. आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज आणि कठोर कारवाईवर शरद पवार यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांच्या या कारवाईत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून, यावर पवारांनी भाष्य करताना विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे स्पष्ट केले. सरकारकडून जर या मागण्या वेळेत पूर्ण केल्या गेल्या नाहीत, तर विद्यार्थी शांत बसणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संसदेत आणि संसदेच्या बाहेरही विद्यार्थ्यांच्या या सर्व मागण्या आणि अकाउंटेबिलिटीचा मुद्दा ठामपणे मांडेल, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.
शरद पवारांना रोखलं?
या आंदोलनादरम्यान शरद पवार प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचले असताना त्यांना जखमी विद्यार्थ्यांना भेटण्यापासून रोखण्यात आल्याचा गंभीर आरोप कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी केला आहे. पवारांचे वय आणि प्रकृती लक्षात घेता, त्यांना मोठा वळसा घालून येणे किंवा स्टेजच्या उंच पायऱ्या चढणे अशक्य होते. त्यामुळे समोरचे बॅरिकेड्स केवळ पाच मिनिटांसाठी बाजूला करून पवारांना आत येऊ द्यावे, अशी विनंती पोलिसांकडे करण्यात आली होती. जेणेकरून पवार थेट समोर बसलेल्या जखमी विद्यार्थ्यांना भेटून त्यांची विचारपूस करू शकले असते. मात्र, पोलिसांनी ही विनंती फेटाळून लावत बॅरिकेड्स हटवण्यास स्पष्ट नकार दिला आणि केवळ इकडून तिकडे अधिकाऱ्यांकडे बोट दाखवून वेळ काढूपणा केला.
हे ही वाचा : Maharashtra Weather : मुंबईसह राज्यातील 'या' जिल्ह्यांत वरुणराजाचं रौद्ररूप; IMD चा अंदाज
अभिजीत दिपके काय म्हणाले?
पोलिसांच्या या आडमुठ्या भूमिकेवर आंदोलकांनी आणि अभिजित दीपके यांनी अत्यंत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. केरळ हाऊसपर्यंत संपूर्ण परिसर छावणीचे रूप धारण करून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. "मुलींवर आणि मुलांच्या मानेवर लाठ्या मारणाऱ्या पोलिसांना एका ज्येष्ठ खासदाराला आणि पक्षाध्यक्षांना विद्यार्थ्यांना भेटू देण्याचे सौजन्य दाखवता आले नाही," असा आरोप आंदोलकांनी केला. शरद पवार जखमी विद्यार्थ्यांना भेटल्यास आंदोलनाला अधिक मोठे स्वरूप प्राप्त होईल आणि ही बातमी देशभर गाजेल, याच भीतीने पोलिसांनी पवारांना आत येऊ दिले नाही, असा थेट दावाही कार्यकर्त्यांनी केला आहे. शेवटी पोलिसांच्या या वागण्यावर वेळ न घालवता पवारांनी बाहेरूनच आपला पाठिंबा व्यक्त केला.
हे ही वाचा : 'परवानगीशिवाय ती रुममध्ये आली अन्...' महिला IPS अधिकाऱ्यावर गंभीर आरोप, काय घडलं?
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या
या आंदोलनातून आता विरोधक आणि विद्यार्थ्यांचा लढा अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना एक कोटी रुपयांची भरपाई मिळावी, सोनम वांगचुक यांची तातडीने सुटका व्हावी, आणि मुंबई, नागपूरसह ठिकठिकाणी विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व एफआयआर मागे घेऊन दोषी पोलिसांवर कडक कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्या या वेळी लावून धरण्यात आल्या. शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसारख्या प्रमुख विरोधी नेत्यांनी या आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्यामुळे आता हे आंदोलन अधिक आक्रमक व व्यापक वळण घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.










