दुष्काळी तालुक्यांचे यादीतून वगळल्याने सत्ताधारी नेते नाराज, आता सरकारचा मोठा निर्णय
Maharashtra drought : राज्यात यापूर्वी 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केल्यानंतर आणखी 19 तालुक्यांचा यादीत समावेश करण्यात आला आहे. या तालुक्यांत पीक सर्वेक्षण, पाणीपुरवठा, चारा आणि कर्जवसुलीबाबत प्रशासनाला विविध सूचना देण्यात आल्या आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दुष्काळी तालुक्यांचे यादीतून वगळल्याने सत्ताधारी नेते नाराज
आता सरकारचा मोठा निर्णय
Maharashtra drought : राज्यातील दुष्काळी तालुक्यांच्या यादीवरून मंत्र्यांनी आणि सत्ताधारी आमदारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर राज्य सरकारने आणखी 19 तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर लोकप्रतिनिधींनी आणखी काही तालुक्यांचा दुष्काळी परिस्थितीत समावेश करण्याची मागणी केली होती. या मागणीचा विचार करून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 43 तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याचे आदेश मदत व पुनर्वसन विभागाला देण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी आणखी 19 तालुक्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
या 19 तालुक्यांची जिल्हानिहाय नावे पुढीलप्रमाणे :
नांदेड - मुदखेड, मुखेड व अर्धापूर
चंद्रपूर - जिवती, ब्रह्मपुरी व बल्लारपूर
गोंदिया - आमगाव, देवरी, सालेकसा व गोंदिया
वर्धा - कारंजा
भंडारा - मोहाडी व तुमसर
नाशिक - त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाड
सातारा - पाटण
सांगली - शिराळा व वाळवा
या यादीत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, भाजप खासदार अशोक चव्हाण, भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघातील तालुक्यांचाही समावेश आहे. अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, मुखेड आणि अर्धापूर, सुधीर मुनगंटीवार व विजय वडेट्टीवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती, ब्रह्मपुरी आणि बल्लारपूर तसेच शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्याचा यात समावेश आहे.
