शिंदे गटाचा ठाकरेंवर गंभीर आरोप, थेट पोलिसातच तक्रार; नेमकं प्रकरण काय?
‘शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह आमच्याकडे असूनसुद्धा ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या पॅनकार्ड आणि टॅन कार्डचा गैरवापर सुरु असल्याचा गंभीर आरोप करून या प्रकरणी थेट मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे.

Shiv sena: शिंदे गट आणि ठाकरे गटाचा वाद आता टोकाला गेला आहे. हा वाद विकोपाला जात ठाकरे गटाविरोधात शिंदे गटाचे आमदार किरण पावसकरांनी थेट मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. ‘शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह आमच्याकडे असूनसुद्धा शिवसेनेच्या पॅनकार्ड (Pan Card) आणि टॅन कार्डचा (Tan Card) उबाठा पक्षाकडून गैरवापर सुरु आहे’ असा गंभीर आरोप शिवसेनेचे (Shiv sena) आमदार किरण पावसकरांनी (Kiran Pawaskar) केला आहे.
फौजदारी गुन्हा दाखल करा
‘शिवसेना पक्षाचे असलेले पॅनकार्ड व टॅन कार्डचा तसेच आयकर विभाग संबंधित लॉग-इन व पासवर्डचा गैरवापर होत आहे. त्यामुळे त्याचा होत असल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा’ अशी मागणीही किरण पावसकरांनी केली आहे.याबाबत किरण पावसकरांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत लेखी तक्रार नोंद केली आहे.
हे ही वाचा >> ‘मविआ’ने तो निर्णय घेतला! प्रकाश आंबेडकरांना दिलं पत्र
पक्षाच्या अकाउंटचा गोंधळ
किरण पावसकरांनी सांगितले की, ‘शिवसेना पक्ष व पक्षचिन्ह निवडणूक आयोगाने आम्हाला दिले आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांनीदेखील सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार आमच्या बाजूने निर्णय दिलेला आहे. मात्र असे असूनसुद्धा पक्षाच्या अकाउंटसंबंधित कामं करताना तसेच आयकर खात्याच्या निर्देशानुसार जे लॉग-इन करावे लागते, त्याचा पासवर्ड लागतो. त्याबाबतही गोंधळ सुरु आहे.’
ठाकरेंच्या शिवसेनेकडून गैरवापर
‘शिवसेना पक्षाच्या नावाचा, पक्षाच्या मूळ पॅनकार्ड, टॅन कार्ड (TAN कार्ड), तसेच आयकर संबंधित गोष्टींचा उबाठा पक्षाकडून गैरवापर सुरु असल्याचा आमचा आरोप असून यासंदर्भातदेखील सखोल चौकशी व्हावी, आणि संबंधितांवर गंभीर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा’ अशी आमची मागणीही पावसकरांनी केली आहे.याबाबत त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, ‘याआधीही कुणी त्याचा गैरवापर करून व्यवहार केला असेल, पैसे काढले असतील तर त्याचीसुद्धा सखोल चौकशी करण्यात यावी’ अशीही मागणी त्यांनी केली आहे.
घोटाळा असेल तर…
किरण पावसकर यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, ‘आम्ही आमच्यासाठी पैसे घेतले नाहीत. आमचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूर्वीपासूनचे वाक्य होते, आम्हाला त्यांची प्रॉपर्टी व पैसे नकोत. आम्हाला फक्त बाळासाहेबांचे नाव व शिवसेनेचे आमदार-खासदार जे आमच्याकडे आलेले आहेत. त्यांची फक्त काळजी घ्यायची आहे. मात्र आता आता नियमानुसार आयकर व टीडीएस भरण्यासाठी आम्हाला तांत्रिक गोष्टींचीही गरज आहे. त्यामुळे त्यामध्ये जर घोटाळा होत असेल, तर त्याची चौकशी होणे गरजेच आहे. यासाठीच आम्ही आज मुंबई पोलीस आयुक्तांना भेटून त्यांच्याजवळ यांसंबंधी लेखी तक्रार दिल्याचेही त्यांनी सांगितले.’