महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारं शरद पवारांचं ‘ते’ भाषण जसंच्या तसं…

मुंबई तक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवृत्तीचे भाषण जसंच्या तसे

ADVERTISEMENT

NCP President Sharad Pawar's retirement speech
NCP President Sharad Pawar's retirement speech
social share
google news

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. मुंबईत ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्र पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी याबाबतची घोषणा केली. “कोठेतरी थांबणे आवश्यक आहे, मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आता पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पुढील अध्यक्ष कोण याबाबतचा निर्णय घ्यावा. तसंच सध्याची राज्यसभेची टर्म संपल्यानंतर पुन्हा निवडणुकीला उभं राहणार नाही. आता नवी जबाबदारी नको, असं म्हणतं त्यांनी पक्षाच्या आणि संसदीय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली.

दरम्यान, शरद पवार यांच्या या अचानक केलेल्या घोषणेने राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सभागृहात  कार्यकर्ते आणि नेते भावूक झाले असून पवारांनी निवृत्तीची घोषणा मागे घ्यावी अशी मागणी केली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्य जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासह आमदार धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड हे सर्वजण भावूक झाल्याच दिसून आलं. धनंजय मुंडे यांनी पाया पडून शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली. सर्व कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर येऊन पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली.

काय म्हणाले शरद पवार? ते’ भाषण जसंच्या तसं…

१ मे १९६० रोजी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्याच दिवशी म्हणजे १ मे १९६० रोजी मी पुणे शहर युवक काँग्रेसचा सभासद झालो. मी काँग्रेसच्या सर्व कार्यक्रमांना हजर राहत असल्याने माझी पुण्याच्या काँग्रेस भवनात जाण्यास सुरूवात झाली. साधारणतः तीनेक वर्षांनंतर माझ्या कामाची पद्धत बघून मला युवकांच्या राज्य संघटनेत काम करण्याची संधी मिळाली आणि माझा मुक्काम पुण्यातून हलून मुंबईमधील दादर भागात असलेल्या टिळक भवन मध्ये झाला. तिथून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांच्या संघटनेमधील युवक काँग्रेस मित्रांशी माझा संपर्क सुरू झाला. राज्यपातळीवरील वरिष्ठ नेत्यांशीही माझा संपर्क होऊ लागला. ह्याच कालावधीत राष्ट्रीय युवक काँग्रेसने ‘अन्य देशांमध्ये नव्या पिढीतील नेतृत्व कसे तयार केले जाते, त्यासाठी कोणता कृती कार्यक्रम आखला जातो’ याचा अभ्यास करण्यासाठी माझी ‘वर्ल्ड असेम्ब्ली ऑफ युथ’ शिष्यवृत्तीतून निवड झाली. त्याद्वारे मला जापान, अमेरिका, कॅनडा, डेन्मार्क या देशांत जाता आले व तेथील वरिष्ठ नेते व संघटनेच्या कामकाजाची पद्धत पाहता आली.

दरम्यान, १९६६च्या वर्षात भारतामध्ये सार्वत्रिक निवडणूकीची हालचाल सुरू झाली व मला परदेश दौरा अर्धवट सोडून भारतात परतावे लागले. या काळात काँग्रेस पक्षामध्ये लोकसभा व विधानसभा उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली. ह्या सार्वत्रिक निवडणूकींमध्ये काही जागा युवकांना देण्या याव्यात असा वरिष्ठ नेतृत्वाचा आग्रह होता. ह्याच आग्रहामुळे बारामती विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून माझी निवड झाली. या निवडणूकीत माझ्या समोरचा उमेदवार सहकारी चळवळीतील शक्तीशाली व्यक्ती होता. परंतू युवक काँग्रेसच्या चळवळीमध्ये कार्यरत असताना हजारो तरुणांशी आलेल्या माझ्या संपर्कामुळे तमाम युवा शक्तीने माझी निवडणूक हाती घेतली आणि मोठया मतांनी मी विधानसभेत निवडून आलो. विधानसभेवर निवडणून गेलो तेव्हा मी २७ वर्षांचा तरूण होतो. महाराष्ट्राच्या विधानसभेत काँग्रेस पक्षातून माझ्यासह अनेक नवीन चेहरे आले. मी उमेदीने विधीमंडळाच्या कामात रस घेऊ लागलो. याचीच दखल घेतली जाऊन विधीमंडळ काँग्रेस पक्षाचा सेक्रेटरी म्हणून माझी निवड झाली.

हे वाचलं का?

    follow whatsapp