300 कोटींच्या Land Deal मध्ये अडकलेले पार्थ पवार आहेत तरी कोण? अजितदादांच्या मोठ्या मुलाची A to Z माहिती!
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे जमीन घोटाळ्यात अडकले आहेत. सरकारी जमीन खरेदीत अनियमितता करणाऱ्या कंपनीत ते भागीदार आहेत. पण याशिवाय पार्थ पवार यांची नेमकी राजकीय, सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी काय हे आपण जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

मुंबईच्या ऑल-बॉईज कॅम्पियन स्कूलमध्ये फुटबॉल खेळणारा एक बिनधास्त मुलगा त्याचं पूर्ण आयुष्य त्याच्या पद्धतीने जगू इच्छितो. त्याला वाटतं की, राजकीय कुटुंबात जन्म घेतल्याने आपण लवकरच राजकारणात येणार आहोत. म्हणून, त्याला त्याआधीच जीवनातील सर्व सुखांचा आनंद घ्यायचा होता. "एकदा मी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला की, मी हे सर्व करू शकणार नाही." असं म्हणत थेट व्यावसायिक शिक्षणासाठी त्याने लंडनला जाणं पसंत केलं...
त्याने लंडनमधील रीजेंट विद्यापीठात प्रवेश मिळवला, परंतु त्याचे वडील अजित पवार हे त्याला मौजमजेसाठी पुरेसे पैसे पाठवायचे नाही. त्यामुळे लवकरच त्याचा हिरमोड झाला. त्याला लंडनमध्ये जगणं अजिबातच आरामदायी वाटलं नाही. ज्या तरुणाचं बालपण हे कायम पोलीस सुरक्षा, मंत्री आणि सत्तेच्या वर्तुळातच गेलं, त्याला लंडनचे "अनामिक" जीवन हे नकोसं वाटू लागलं
शेवटी दोनच वर्षे परदेशात राहून त्याने थेट मुंबई विद्यापीठ गाठलं. इथेच आपली पदवीही पूर्ण केली. याच दरम्यान, त्याचा ओढा राजकारणाकडे वाढू लागला. अनेक वर्ष त्याने त्याच्या आजोबा आणि वडिलांना सत्तेत पाहिलं होतं. त्यामुळे निवडणूक लढवण्याच्या सुप्त इच्छेला तो अजिबात आळा घालू शकला नाही. 2019 मध्ये, त्याने आजोबा शरद पवारांचं मत फारसं विचारात न घेता थेट निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला, परंतु इथेच त्याला पहिला झटका बसला.. कारण निवडणुकीच्या रिंगणात पराभवाची चव चाखणारा तो पहिला "पवार" ठरला.
हे ही वाचा>> Exclusive: रेवती Buildcon कंपनीसह पार्थ पवारांकडे 'एवढ्या' कंपन्यांचं संचालक पद!
बंडखोर वृत्तीने राजकीय कारकिर्द सुरू करणारा हा मुलगा प्रत्येक पावलावर त्याच्या पक्षाच्या आणि कुटुंबाच्या, विशेषतः त्याचे आजोबा शरद पवार यांच्या विचारसरणीला आव्हान देणारा ठरला. आतापर्यंतच्या राजकीय कारकीर्दत अनेकदा वादात सापडलेला हा तरूण नेता आता पुन्हा एकदा तो अडचणीत आला आहे. कारण त्याचं नाव थेट जमीन व्यवहाराशी संबंधित घोटाळ्यात पुढं आलं आहे.










