अजितदादांचं वाढणार टेन्शन! शरद पवार-हर्षवर्धन पाटलांची भेट; राजकारण काय?
शरद पवार-हर्षवर्धन पाटील यांची दौंडमध्ये भेट झाली. या भेटीचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राजकारण यामुळे बदलू शकते, असं यानिमित्ताने चर्चा होत आहे.
ADVERTISEMENT

Sharad Pawar Ajit Pawar Supriya Sule : अनंतराव पवार यांच्या नावावरुन असलेल्या शाळेच्या उद्घाटनाचा सोहळा रविवारी (22 ऑक्टोबर) पार पडला. या कार्यक्रमाला पवार कुटुंबीय उपस्थित होतं. शरद पवार आणि अजित पवार यावेळी एकत्र आलेले पाहायला मिळाले. शरद पवार अजित पवार एकत्र असले, तरी अजित पवारांनी शरद पवारांशी बोलणं टाळलं. पवारांच्या भाषणानंतर अजित पवार कार्यक्रमातून लगेच निघून गेले. पण, याच शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्या संवादाचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतोय. ज्यामध्ये शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील हसत एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. या व्हिडीओवरुन नव्या राजकीय समीकरणाचे अंदाज बांधण्यास सुरुवात झाली आहे. ‘कालचे हे चित्र नक्कीच अनेकांची झोप उडवणार आहे… असं महाविकास आघाडी ऑफिशयल या ट्विटर हँडलवर देखील म्हटलं आहे. (Sharad Pawar Met Harshwardhan Patil)
एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होतोय. या व्हिडीओमध्ये शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील हसताना दिसत आहेत. या व्हिडीओवरुन आता अनेक अर्थ लावले जात आहेत. पवार कुटुंबाच्या कार्यक्रमाला हर्षवर्धन पाटील यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते.
कालचे हे चित्र नक्कीच अनेकांची झोप उडवणार आहे…..
दौंड तालुका येशील विद्या प्रतिष्ठानचे ‘अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूल’, या नूतन वास्तूचे उद्घाटन व नामकरण समारंभ प्रसंगीचा संवाद @Harshvardhanji @supriya_sule @Mahadev_Balgude pic.twitter.com/JStlQMCKlc— महाविकास आघाडी Official (@MahavikasAghad3) October 23, 2023
अजित पवार-हर्षवर्धन पाटील संघर्ष
राष्ट्रवादी विशेषतः अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचा जुना वाद आहे. २०१९ च्या निवडणुकीला आघाडी नाही झाली, तरी चालेल पण इंदापूरची जागा राष्ट्रवादी सोडणार नाही, असं अजित पवार म्हणाले होते. नंतर इंदापूरची जागा मीच लढवणार असं हर्षवर्धन पाटील म्हणाले होते. पुढे झालं असं की निवडणुकीच्या आधी हर्षवर्धन पाटील हे भाजपात गेले होते. राष्ट्रवादीमुळे काँग्रेस सोडली असा आरोप त्यांनी त्यावेळी केला होता. त्यामुळे अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचा वाद सर्वश्रुत आहे.