'विद्यानंद बापट यांना मी ओळखत नाही पण...', पाहा शरद पवारांनी कोणाचे टोचले कान
विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. मत व्यक्त केल्यामुळे हल्ला होणं हा लोकशाहीवरील आघात असल्याचं सांगत, त्यांनी कठोर धोरणाची मागणी केली.
ADVERTISEMENT

पुणे: पुण्यातील विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ‘विद्यानंद बापट यांना मी ओळखत नाही, पण ते जे बोलत आहेत त्याला अर्थ आहे,’ असं म्हणत शरद पवार यांनी सण-उत्सवांमधील डीजेचा आवाज आणि रस्त्यावरील कार्यक्रमांबाबत मत व्यक्त केलं. केवळ मत व्यक्त केल्यामुळे एखाद्यावर हल्ला होणं, हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवरचा हल्ला असल्याचं त्यांनी म्हटलं. तसंच, अशा घटना थांबवण्यासाठी पुणे पोलिस आयुक्त आणि राज्य सरकारने कठोर धोरण स्वीकारण्याची गरज असल्याचंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
‘विद्यानंद बापट जे बोलत आहेत त्याला अर्थ आहे’
विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी त्यांच्या भूमिकेचं समर्थन केलं. बापट यांना आपण वैयक्तिकरित्या ओळखत नसल्याचं सांगत, त्यांनी मांडलेल्या मुद्द्याला अर्थ असल्याचं पवार यांनी म्हटलं.
“विद्यानंद बापट यांना मी ओळखत नाही. पण विद्यानंद बापट जे बोलत आहेत त्याला अर्थ आहे.”
सण आणि उत्सव हे लोकांना आनंद देणारे असले पाहिजेत, असं शरद पवार यांनी म्हटलं. मात्र, डीजेच्या आवाजामुळे आणि रस्त्यावरील कार्यक्रमांमुळे सणाचं गांभीर्य कमी होतं, अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘मत व्यक्त केलं म्हणून थेट हल्ला हा लोकशाहीवरील आघात’
एखाद्या व्यक्तीने सण-उत्सवांबाबत आपलं मत व्यक्त केलं म्हणून त्याच्यावर हल्ला होणं, हे लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवरचं आक्रमण असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
