Eknath Shinde : ‘शिवसेनेच्या 5 मंत्र्यांना काढा’, हायकमांडचा CM शिंदेंना आदेश, ‘ते’ मंत्री कोण?
शिंदे-फडणवीस सरकारमधील पाच निष्क्रिय मंत्र्यांना हटविण्याचे आदेश भाजप हायकमांडने मुख्यमंत्री शिंदेंना दिल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप सरकारमध्ये धुसफूस सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) अस्तित्वात असणारं महाविकास आघाडीचं सरकार (MVA Govt) पाडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे थेट भाजपच्या (BJP) पाठिंब्यावर मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणाऱ्या ठाकरेंना धडा शिकविण्यासाठी भाजपने शिंदेंना सर्वोतोपरी ‘ताकद’ही पुरवली. त्यामुळे सत्तेत आलेलं हे शिंदे-फडणवीस सरकार गुण्यागोविंदाने नांदेल अशी अनेकांना आशा होती. मात्र, या सरकारला वर्ष होत नाही तोच त्यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. अशातच आता असंही समोर आलं आहे की, शिंदेंच्या शिवसेनेतील पाच मंत्र्यांना मंत्रिमंडळातून हटविण्याच्या सूचना या शिंदेंना करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार देखील रखडला आहे.
पाचही दिग्गज मंत्र्यांना डच्चू देण्याचा भाजपचा आग्रह?
शिंदेंच्या सरकारमध्ये असणाऱ्या पाच दिग्गज मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवावा असं थेट भाजपच्या हायकमांडने मुख्यमंत्री शिंदेंना सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लवकरच विस्तार होईल असं वारंवार म्हटलं जात होतं. मात्र, शिंदेनी केलेल्या बंडात ज्या पाच दिग्गज नेत्यांचा समावेश होता त्यांनाच हटविण्याचे आदेश भाजप हायकमांडने दिल्याने मुख्यमंत्री शिंदेंची इकडे आड, तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे.
भाजपकडून नेहमीच मंत्र्यांच्या कामगिरीचं अवलोकन केलं जात असतं. त्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा भाजपने तयार केली आहे. असं असताना शिंदेंचं पाच मंत्री हे पुढील निवडणुकीसाठी अडचण ठरू शकतात. असा शेरा या यंत्रणेने मारला आहे. ज्यामुळे आता भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने थेट शिंदेंना त्यांच्याच पक्षातील पाच मंत्र्यांना हटविण्याचे आदेश दिले असल्याचं समजतं आहे.
कोण ते पाच मंत्री? ज्यांच्यावर भाजप हायकमांडची वक्रदृष्टी
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, संजय राठोड आणि संदीपान भुमरे यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. खरं तर भाजपने आतापर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळात आणि काही राज्यात हा फॉर्म्युला वापरला आहे. पण असं असलं तरी आता युतीतीलच पक्षाला मंत्र्यांना हटवा असा आदेश भाजपने शिंदेंना दिल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे. ज्यावरुन विरोधक त्यांच्यावर आता निशाणा साधत आहेत.