Shiv Sena UBT : “शिंदे गटात सरळ दोन गट पडलेत, उद्याच्या बेदिलीची ठिणगी…”
शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यावर ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे खासदार, आमदार, इतर नेते अयोध्येचा दौरा करून आले. शिवसेनेच्या या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचेही अनेक नेते सहभागी झाले होते. या दौऱ्यावर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सामना अग्रलेखातून भाष्य करताना शिंदे आणि फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.
शिवसेनेने सामना अग्रलेखात म्हटलं आहे की, “डॉ. मिंधे व त्यांचे चाळीस लोक हे आधी सुरत व नंतर रेडय़ांची पूजाविधी करण्यासाठी गुवाहाटीस गेले. सत्ता स्थापन झाल्यावरही ते लोक अघोरी रेडा विधीसाठी पुन्हा गुवाहाटीस गेले, पण गुवाहाटीऐवजी श्रीरामांच्या अयोध्येत जावे असे या ‘भक्तां’ना वाटले नाही, हे आश्चर्यच आहे.”
एकनाथ शिंदे आणि अनेक मंत्री, नेते अयोध्येला गेले. असं असलं, तरी शिवसेनेचे काही मंत्री आणि पदाधिकारी या दौऱ्यात सहभागी झाले नाहीत. त्यांच्या सहभागी न होण्याबद्दल ठाकरे गटाने सामनातून मोठं विधान केलं आहे. अग्रलेखात म्हटलं आहे की, “श्रीरामांपासून सत्य दडवता येणार नाही व राम असत्याला आशीर्वाद देणार नाहीत याची खात्री असल्यानेच हे लोक अयोध्येऐवजी गुवाहाटीस गेले. आता मिंधे सरकारातील काही मंत्री आणि आमदार अयोध्येत गेले, पण बरेच आमदार अयोध्या यात्रेत सामील झाले नाहीत, ते महाराष्ट्रातच राहिले. श्रीरामांच्या दर्शनास जाऊ नये असे त्यांना का वाटले, हे रहस्य आहे. मिंधे गटात सरळ दोन गट पडले आहेत व उद्याच्या बेदिलीची ठिणगी अयोध्येच्या भूमीवर पडली आहे.”
शिंदेंच्या स्वागतावरून भाजपवर टीकास्त्र
एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी भाजपचे मंत्री आणि नेते हजर होते. त्यांचं जल्लोषात स्वागत झाल्याचं पाहायला मिळालं. यावर भूमिका मांडतांना ठाकरे गटाने म्हटलं आहे की, “अयोध्येत उत्सव आहे की राजकीय निरोप समारंभ हे येणारा काळच ठरवेल. ‘गाड्याबरोबर नाळ्याची यात्रा’ या उक्तीप्रमाणे भाजपही अयोध्या यात्रेत सामील झाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी म्हणे यात्रेची चोख व्यवस्था केली. बेइमानांसाठी पायघड्या घालणे ही तर भाजपची संस्कृतीच आहे व त्याबद्दल आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.”