इथेनॉलवर जडला जीव, पण साखरेने केला गेम! मोदी सरकार साखर स्वस्त करणार की नाही?
पेट्रोलमध्ये E20 इथेनॉल मिश्रण वाढल्यामुळे साखरेचे दर वाढत आहेत का? ऊस, इथेनॉल, साखरेचा तुटवडा, आयात या सगळ्याचा सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होत आहे जाणून घ्या.
ADVERTISEMENT

मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल वाढवलं पण त्याचा फटका आता साखरेला बसतोय.. एकीकडे पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचं लक्ष्य गाठण्याची तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे बाजारात साखरेचे भाव वाढताना दिसतायेत. गेल्या महिनाभरात साखरेच्या किंमती जवळपास 10 टक्क्यांनी वाढल्या आहेत. कोल्हापुरात तर साखरेचा घाऊक भाव ऑगस्टच्या सुरुवातीपासून जवळपास 20 टक्क्यांनी वाढून 5 हजार 350 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास पोहोचला आहे. तर किरकोळ बाजारात साखरेचे दर थेट 60 ते 65 रुपये किलोपर्यंत पोहचले आहेत.
त्यामुळे आता सगळ्यात मोठा प्रश्न असाए की, भारतासारख्या जगातील प्रमुख साखर उत्पादक देशाला परदेशातून साखर आयात करण्याची वेळ का येतेय? याचा संबंध थेट E20 इथेनॉल धोरणाशी आहे का? आणि जर उसाचा वापर साखरेऐवजी इथेनॉलसाठी वाढत गेला, तर त्याचा परिणाम फक्त पेट्रोलच्या टाकीवर होणार आहे की आपल्या स्वयंपाकघराच्या बजेटवरही? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया.
साखर अचानक महाग का होतेय?
सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया की, देशात साखर संपलेली नाही. आपल्याकडे आजही मोठ्या प्रमाणावर साखरेचं उत्पादन होतंय. मग असं असताना साखर अचानक का महाग झाली? तर याचं साधं कारण आहे ते म्हणजे बाजारात उपलब्ध असलेली साखर आणि तिची मागणी यामधलं गणित बिघडतंय.
2025-26 च्या साखर हंगामात भारतात जवळपास 3 कोटी 11 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. खरं तर हा आकडा मोठा आहे. पण या आकड्याकडे फक्त वरवर पाहून चालणार नाही.
