खड्ड्यांचं रिपोर्टिंग करणाऱ्या व्हायरल मुलींना राज ठाकरेंनी काय सांगितलं?
कोंदिवडे गावातील रस्त्यांवरील खड्ड्यांचं शाळकरी मुलींनी केलेलं अवघ्या 47 सेकंदांचं भन्नाट रिपोर्टिंग सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आणि या मुली थेट महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचल्या. या छोट्या रिपोर्टर्सची दखल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही घेतली. राज ठाकरे यांनी या मुलींना भेटीसाठी बोलावून त्यांचा सन्मान केला आणि त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
खड्ड्यांचं रिपोर्टिंग करणाऱ्या व्हायरल मुली राज ठाकरेंना भेटल्या
यावेळी राज ठाकरे काय म्हणाले?
Raj Thackeray : छत्रीचा माईक बनवून कोंदिवडे गावातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे अवघ्या 47 सेकंदांचे भन्नाट रिपोर्टिंग करणाऱ्या शाळकरी मुली सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्या आहेत. 'रिपोर्टर ज्योत्स्ना'च्या अंदाजात या मुलींनी केवळ आपल्या गावच्या रस्त्यांची व्यथा मांडली नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील खड्डेमय रस्त्यांचे वास्तव अत्यंत प्रभावीपणे समोर आणले. त्यांच्या या अनोख्या आणि निरागस शैलीने या मुली अल्पावधीतच महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचल्या आणि त्यांनी सर्वांची मने जिंकली. याची दखल घेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी या मुलींना भेटीसाठी बोलावून त्यांच्या सन्मान केला.
प्रशासनाला आली जाग
या व्हायरल व्हिडिओमध्ये मुलींनी रस्त्यांची अवस्था सांगताना अतिशय मार्मिक शब्दांत प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत. "हा रस्ता जणू द्रुतगती महामार्गासारखा आहे, खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा हेच कळत नाही," असे म्हणत त्यांनी व्यवस्थेवर अचूक बोट ठेवले. रिपोर्टर ज्योत्स्ना, नेहा घारे आणि कॅमेरामन मानसी पवार या चिमुकल्या टीमने केलेला हा व्हिडिओ इतका गाजला की, अखेर प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी तातडीने या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली.
हे ही वाचा : गाडीला कट मारल्याचा वाद, रीलस्टारवर पुण्याच्या कॅफेत कोयत्याने वार
राज ठाकरेंची भेट
या छोट्या आणि धडाडीच्या रिपोर्टर्सची दखल थेट राज ठाकरे यांनी घेतली. त्यांनी या मुलींना खास भेटीसाठी बोलावून त्यांचा सन्मान केला आणि त्यांच्याशी अत्यंत मनमोकळ्या गप्पा मारल्या. "इतर कोणत्याही नेत्याने आम्हाला बोलावले नव्हते, पण राज साहेबांनी आमची दखल घेऊन बोलावले याचा आम्हाला खूप आनंद झाला," अशी कृतज्ञता या मुलींनी व्यक्त केली. राज ठाकरे यांच्याकडून मिळालेल्या या कौतुकामुळे आणि आशीर्वादामुळे या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.
हे ही वाचा : Maharashtra Weather : पावसाचा वेग मंदावला, मान्सून गायब होण्याची शक्यता?
तुम्ही पत्रकार बनणार का?
या भेटीदरम्यान राज ठाकरे यांनी मुलींना, "पुढे जाऊन तुम्ही पत्रकार बनणार का?" असा प्रश्न विचारला. मात्र, मुलींच्या उत्तराने स्वतः राज ठाकरे आणि तिथे उपस्थित असलेले सर्वच जण थक्क झाले. या मुलींनी सांगितले की, त्यांना पत्रकार नव्हे तर युट्यूबर आणि स्केच आर्टिस्ट बनायचे आहे. त्यांचे हे अनपेक्षित पण स्पष्ट उत्तर ऐकून राज ठाकरे यांनीही त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, सध्या तुम्ही दहावीत आहात, त्यामुळे आता संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित करा, असा मोलाचा सल्लाही त्यांनी या मुलींना दिला.
