Shiv Sena : "ठाकरेंनी रॅण्ड घोटाळ्यातील गुप्ताची घेतली भेट", शिंदेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
uddhav Thackeray Naresh mhaske : उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत घोटाळ्यातील आरोप असलेल्या गुप्ता बंधूची भेट घेतली, असा दावा खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांचा गौप्यस्फोट

निवडणूक फंडासाठी भेट घेतल्याचा संशय

भेटीची चौकशीची करण्याची केली मागणी
Naresh Mhaske on Uddhav Thackeray : 'दक्षिण अफ्रिकेत अब्जावधींचा रॅण्ड घोटाळा करणाऱ्या गुप्ता बंधूंपैकी एक जण दिल्लीत आला होता. या गुप्ताची उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली", असा स्फोटक दावा शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही म्हस्के यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी काँग्रेससह इंडिया आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. ठाकरे दिल्लीतून मुंबईत परतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी खळबळ उडवून देणारा दावा केला आहे.
नरेश म्हस्के यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. "दक्षिण आफ्रिकेत गुप्ता बंधू यांनी अब्जावधी रुपयांचा रॅण्ड घोटाळा केला आहे. याप्रकरणातील एक आरोपी गुप्ता दिल्लीत आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्याची अर्धा तास भेट घेतली असल्याची माहिती माझ्याकडे आहे", असा दावा खासदार म्हस्के यांनी केला.
"संजय राऊतांच्या घरातील सीसीटीव्ही बंद असतील"
खासदार नरेश म्हस्के यांनी असाही दावा केला आहे की, "गुप्ता आणि उद्धव ठाकरे यांची भेट उघड होऊ नये यासाठी दिल्लीतील संजय राऊत यांच्या घराच्या परिसरातले सीसीटीव्ही कदाचीत बंद ठेवले असतील. पण, या भागातल्या रस्त्यांवर सीसीटीव्ही आहेत यात हा प्रकार उघड होईलच; तपास यंत्रणांनी याची दखल घेऊन चौकशी करावी", अशी मागणी म्हस्के यांनी केली आहे.