शिवसेना खासदार संजय राऊत १०३ दिवसांनी माध्यमांसमोर, म्हणाले..

वाचा सविस्तर बातमी काय म्हटलं आहे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी?
What Shivsena MP Sanjay Raut Said To Media After 103 Days
What Shivsena MP Sanjay Raut Said To Media After 103 Days

आज तीन महिन्यांनी मी हातात घड्याळ घातलं आहे. तुरुंगात राहणं ही काही चांगली बाब नाही. जगातलं कुठलंही जेल चांगलं असेल असं कुणाला वाटत असेल तर तसं ते नाही. ते खूप कठीण असतं. आता मी बाहेर आलो आहे माझं स्वागत झालं. मला तीन महिन्यांनी लोक विसरतील असं वाटलं होतं. पण तसं काहीही झालेलं नाही. मी आज आमचे नेते उद्धव ठाकरे यांना भेटायला जाणार आहे. आज शरद पवारांनीही माझ्याशी फोनवरून संवाद साधला असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. १०३ दिवसांनी आज संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

कोर्टाच्या निर्णयामुळे चांगला संदेश देशात गेला

कोर्टाने जी ऑर्डर माझ्या जामिनाबाबत दिली त्यामुळे देशात एक चांगला मेसेज गेला आहे. ज्यांनी हा कट रचला होता त्यांना आनंद झाला असेल तर ठीक आहे. माझ्या मनात कुणाविषयीही तक्रार नाही. माझ्या कुटुंबाने अनेक गोष्टी सहन केल्या. मात्र राजकारणात अशा गोष्टी घडतात. मात्र अशा प्रकारचं राजकारण कधीही देशानं पाहिलं नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राजकीय शत्रू असतील तरीही चांगलं वागण्याची आपल्याकडे परंपरा आहे. ठीक आहे जे झालं ते झालं असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी काही निर्णय चांगले घेतले

महाराष्ट्रात नवं सरकार आलं आहे. त्यांनी काही निर्णय चांगले घेतले आहेत. विरोधासाठी विरोध मी करणार नाही. ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्यांना आम्ही विरोध करणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी काही निर्णय चांगले घेतले आहेत. गरीबांसाठी घरांसाठीचा निर्णय असेल किंवा म्हाडाला अधिकार देण्याचा निर्णय असेल चांगले निर्णय आहेत.

माझी प्रकृती आजही बरी नाही

माझी प्रकृती आजही बरी नाही. मी तुरुंगात होतो तेव्हा एकांतात होतो. वीर सावरकर तुरुंगात इतकी वर्षे कसे राहिले? लोकमान्य टिळक कसे राहिले? याचा विचार मी करत होतो. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. कुणालाही खोट्या आरोपात तुरुंगात पाठवलं गेलं तर ते चूकच आहे. हायकोर्टाने जे निरीक्षण नोंदवलं ते आपण पाहिलं. या देशाच्या न्यायव्यवस्थेवरचा विश्वास वाढला आहे. आज मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांचीही भेट घेणार आहे.

फडणवीस, अमित शाह आणि पंतप्रधान मोदींना भेटणार

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट मी घेणार आहे. राज्याचा कारभार हे उपमुख्यमंत्री चालवत आहेत असं माझं मत आहे. जे माझं काम आहे ते त्यांच्या विभागाशी संबंधित आहे. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असंही राऊत यांनी सांगितलं आहे.

राज ठाकरेंना सल्ला

राज ठाकरे आपल्या भाषणात असं सांगितलं होतं की लवकरच संजय राऊत हे लवकरच तुरुंगात जातील आणि त्यांनी एकांतात बोलण्याची सवय करावी. माझं त्यांना सांगणं आहे की राज ठाकरे जे बोलले तसा विचार शत्रूबाबतही करायचा नाही. मला अटक केली गेली होती मात्र ती बेकायदेशीर होती ते कोर्टाने सांगितलं आहे. मी एकांतात होतो तेव्हा मी वीर सावरकरांचा विचार करत होतो. त्यामुळे शत्रूबाबतही असा विचार करायचा नसतो असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

कटुता संपली पाहिजे असं वक्तव्य मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. मी त्या वक्तव्याचं स्वागत केलं होतं. आजही माझं तेच म्हणणं आहे की राजकारणातली कटुता संपली पाहिजे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत मला सहभागी होता येणार नाही. प्रकृतीच्या कारणामुळे मी सहभागी होऊ शकणार नाही असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in