महाराष्ट्राला भिकारी बनवेन म्हणणारे तानाजी सावंत कोण आहेत? त्यांना इतका राग का येतो?

इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर, प्राध्यापक, साखर कारखानदार, शिक्षण संस्थाचालक ते आता राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत.
Tanaji sawant file photo
Tanaji sawant file photo

इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर, प्राध्यापक, साखर कारखानदार, शिक्षण संस्थाचालक ते आता राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत. तानाजी सावंत हे नाव मागच्या काही दिवसांपासून चांगलंच चर्चिलं जातंय. कधी महाराष्ट्राला भिकारी बनवेन म्हणणं तर कधी खेकड्याने धरण फोडल्याच वक्तव्य. हे दोन्ही विधानं चांगलेच गाजले होते. हे कमी होतं का तर बंडखोरी केल्यापासून तानाजी सावंत या ना त्या कारणामुळे चर्चेत आहेत. त्याचं खापर मात्र त्यांनी मीडियावर फोडलं आहे. याच सगळ्या विषयावर आपण प्रकाश टाकूया.

तानाजी सावंत को गुस्सा क्यूँ आता है? असाच प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर, नंतर प्राध्यापक, साखर कारखानदार, शिक्षण संस्थाचालक असलेले तानाजी सावंत सुरुवातीला सामूहिक विवाह सोहळ्यातून समोर आले. दरवर्षी ते मोठ्या संख्येत सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन परंड्यात करायचे. दरम्यान त्यांनी राजकारणात एंट्री केली ती राष्ट्रवादी पक्षात. नंतर शिवसेनेत गेले. तिथे मातोश्रीच्या जवळ जाऊन पहिल्यांदा विधान परिषदेचं आमदार आणि नंतर युतीच्या सरकारमध्ये मंत्रिपद पटकावलं.

यादरम्यान त्यांनी शिवसेनेत आपलं जम चांगलंच बसवलं होतं. मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असलेले सावंत उस्मानाबाद जिल्ह्यात रमू लागले. त्यांना उस्मानाबाद जिल्ह्याची धुरा देखील देण्यात आली. यादरम्यान उस्मानाबाद शिवसेनेत त्यांनी दबदबा निर्माण केला. ते म्हणतील ती पूर्वदिशा होऊ लागली. मातोश्रीचे जवळचे ते मानले जाऊ लागले. त्यातच पहिलं वादग्रस्त विधान आलं की, महाराष्ट्राला भिकारी बनवेन.

'मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन, तानाजी सावंत कधीही भिकारी होणार नाही'

एका प्रचार सभेत तानाजी सावंत यांनी चिड आणणारं वक्तव्य केलं होतं. उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान ते प्रचार सभेत बोलत होते. 'आज जवळपास सव्वाशे- दीडशे कोटींचा कारखाना चालत-चालत खरेदी करायला मला काही लागत नाही. काही लोकांचा गैरसमज झालाय की, तानाजी सावंत भिकारी झालाय. मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन, तानाजी सावंत कधीही भिकारी होणार नाही,' असं वादग्रस्त वक्तव्य सावंतांनी केलं होतं. यावर विरोधकांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. शेवटी सावंतांना महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी लागली होती.

खेकड्यांनी धरण फोडलं, सावंतांचा अजब दावा

रत्नागिरीतील तिवरे धरण फुटून 24 जणांचा बळी गेला. त्यावेळी तानाजी सावंत हे राज्याचे जलसंधारण मंत्री होते. त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी अजबच दावा केला. थेट धरणफुटीला खेकडे जबाबदार आहेत, असंच त्यांनी बोलून टाकलं. त्यामुळे या वक्तव्याची सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली गेली. हा खेकड्याचं विधान इतकं गाजलं की, गेल्या महिन्यात झालेल्या अधिवेशनात देखील तो विषय निघाला. आता सावंत म्हणतायेत की माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आणि तो मीडियाने केला.

शिंदे गटात गेले आणि पुन्हा चर्चेत आले

महाविकास आघाडी सरकारमध्ये तानाजी सावंताना मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज होते. वेळोवेळी त्यांची नाराजी कधी कृतीतून तर कधी भाषणातून दिसून येत होती. त्यामुळे अखेर त्यांनी एकनाथ शिंदेंसोबत बंडखोरी केली. कधीकाळी मातोश्रीच्या जवळ असणारे तानाजी सावंतांनी थेट कोण आदित्य ठाकरे? तो फक्त एक आमदार, असं बोलल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. गुवाहाटीत असताना त्यांचं पुण्यातील आणि उस्मानाबादमधील कार्यालय फोडल्याचा राग त्यांच्या मनात दिसून आला.

घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर, दौऱ्याची चर्चा

तानाजी सावंत आरोग्यमंत्री असल्याने आदल्या दिवशी त्यांच्या पुढच्या कार्यक्रमाचा दौरा पत्रकाच्या माध्यमाने जाहीर केला जातो. 25 ऑगस्टला त्यांचा दौरा जाहीर झाला आणि त्याची चांगलीच चर्चा झाली. कारण त्यांच्या दौऱ्यात ते दिवसभर घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर इतकाच 1 किमी अंतराचा दौरा करत होते, असं त्यात नमूद होतं. म्हणून या दौऱ्याची चांगलीच चर्चा रंगली होती.

ससून रुग्णालयात जाऊन अधिकाऱ्यांना सुनावलं

ग्रामीण भागातील एका रुग्णाला ससून रुग्णालयात वेळेवर उपचार मिळत नसल्याने त्यांनी थेट त्या रुग्नाला घेऊन ससून गाठले. आणि ऍडमिट करून का घेतलं नाही म्हणून रुग्णालयातील अधिकाऱ्यांना झपा झाप झापलं. त्यांचा हा देखील व्हिडीओ चांगलाच गाजला.

हाफकिन माणूस की संस्था?

नुकतंच एका कथित बातमीचं कात्रण व्हायरल होतोय आणि पुन्हा तानाजी सावंत चर्चेत आले. त्या कथित बातमीत हाफकिन या संस्थेला ते माणूस म्हणाल्याचं छापून आलं. पुन्हा काय? हे कात्रण भलतंच व्हायरल झालं. तानाजी सावंत आरोग्यमंत्री असताना त्यांना याबाबत कसं माहिती नाही, असे प्रश्न विचारले जाऊ लागले.

तानाजी सावंताना हाफकिनचा प्रश्न विचारताच मीडियावर राग काढला

हाफकिन बातमीचं कात्रण इतकं वायरल झालं, त्यामुळे यावर तानाजी सावंत यांना स्पष्टीकरण विचारणं गरजेचं होतं. माध्यम प्रतिनिधींनी सोलापुरात तानाजी सावंत यांना ही हाफकिनची काय भानगड आहे? असं विचारलं. मग काय तानाजी सावंतांचा पारा चढला. "मी मूर्ख आहे का? मी डॉक्टर आहे, पीएचडी होल्डर आहे तसंच रँकर आहे. मीडिया मुद्दाम मला टार्गेट करून दाखवत आहे. जनतेची दिशाभूल केली जात आहे," असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in