
फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यावरून सुरु झालेलं आरोप प्रत्यारोप काही थांबताना दिसत नाही. आज पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. महाविकास आघाडीचे नेते आणि शिंदे फडणवीस सरकार यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख यांनी वेदांता फॉक्सकॉन प्रकरणी केंद्र सरकारची चौकशी करणार की अनिल अग्रवाल यांची असा प्रश्न आता विचारला आहे.
महाराष्ट्रातून फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. त्यानंतर आशिष शेलार यांनी या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे असं म्हटलं होतं. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी आता प्रश्न उपस्थित केला आहे. भाजप या प्रकरणात चौकशी कुणाची करणार मोदी सरकार की अनिल अग्रवाल? असं आदित्य ठाकरे यांनी विचारलं आहे.
महाराष्ट्रासाठी कुणी काही बोलायला लागलं की त्याच्यावर आरोप करायचे. त्याची बदनामी करायची. महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणं हा गुन्हा आहे का? असाही प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला. प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आदित्य ठाकरे मुंबईतल्या माहीममध्ये होते. त्यात फॉक्सकॉनवरून आदित्य ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकार आणि भाजपवर टीका केली.
वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकरणी चौकशी केली पाहिजे. नेमका हा प्रकल्प गुजरातला का गेला? असं आशिष शेलार यांनी म्हटलं होतं. त्यावर बोलत असताना आदित्य ठाकरे म्हणाले की चौकशी करायची आहे? चौकशी कुणाची करणार? मोदी सरकारची करणार की वेदांताच्या अनिल अग्रवाल यांची? गुजरात म्हणजे काय पाकिस्तान आहे का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केलेल्या भाषणात विचारलं होतं. त्यावरही आदित्य ठाकरेंनी भाष्य केलं. महाराष्ट्र पाकिस्तान आहे का? महाराष्ट्रातून हा प्रकल्प गुजरातला का पळवून नेला? प्रकल्प गुजरातला गेला काही हरकत नाही मला वाईट वाटतं ते इथल्या बेरोजगार तरुणांबाबत असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
फॉक्सकॉन हा प्रकल्प दोन महिन्यात गुजरातला गेलाच कसा? गुजरात राज्य महाराष्ट्राचा लहान भाऊ आहे. त्यांच्याकडे हा प्रकल्प गेला पण त्यावेळी राज्य सरकार काय करत होतं? वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने राज्याचं मोठं नुकसान झालं आहे. आम्ही हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले होते. आत्ताचे सत्ताधारी प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याबद्दल आम्हाला दोष देत आहेत. मात्र त्यांनी आत्मपरीक्षण करायची गरज आहे. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी याबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.