Ind vs Eng 5th test : पाचवा सामना रद्द; BCCI ने इंग्लंड बोर्डासमोर ठेवला नवा प्रस्ताव

कोरोनाचा फटका; पाचवा कसोटी सामना रद्द... मालिकेचा निकाल लागण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली व सचिव जय शाह.
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली व सचिव जय शाह.

भारतीय क्रिकेट संघाच्या स्टाफमधील महत्त्वाच्या व्यक्तींनाच कोरोनाची बाधा झाल्यानं पाचवा आणि निर्णायक कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कसोटी सामना रद्द करण्यात आल्यानंतर बीसीसीआयने इंग्लंड क्रिकेट बोर्डासमोर नवीन प्रस्ताव ठेवला असून, रद्द करण्यात आलेला सामना भविष्यात खेळवण्याची विनंती केली आहे.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताने आघाडी घेतलेली असल्यानं सगळ्यांचं लक्ष पाचव्या सामन्याकडे लागलं होतं. मात्र, पाचव्या सामन्याआधीच भारतीय क्रिकेट स्टाफमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्यासह पाचजण कोरोना बाधित झाल्यानं पाचवा आणि मालिकेतील महत्त्वाचा सामना रद्द करावा लागला.

गुरूवारी सर्व खेळाडूंचे कोरोना रिपोर्टस निगेटिव्ह आल्यानं पाचवा सामना खेळल्या जाण्याच्या आशआ पल्लवित झाल्या होत्या. मात्र, सामना सुरू होण्यास काही तासांचाच अवधी बाकी असताना इंग्लंड क्रिकेट बोर्ड व बीसीसीआयने चर्चा करून सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर मालिकेच्या निकालाबद्दल चर्चा सुरू झाली. कारण भारतीय संघ पाचवा सामना खेळण्यास समर्थ नव्हता आणि त्यामुळेच हा सामना रद्द करण्यात आला. या परिस्थितीत इंग्लंडला वॉकओव्हर दिला जाऊ शकतो, याचाच अर्थ इंग्लंडचा संघ हा सामना जिंकला, असं जाहीर केलं शकतं.

ही गोष्ट बीसीसीआयला होऊ द्यायची नाही. त्यामुळे बीसीसीआयने इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डासमोर आता एक प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तवामध्ये रद्द करण्यात आलेला पाचवा कसोटी सामना भविष्यात खेळवण्यात यावा. सामन्याचं वेळ निश्चित करण्यात यावी, असा प्रस्ताव बीसीसीआयने इंग्लंड क्रिकेट बोर्डासमोर ठेवला आहे. त्यामुळे आता या प्रस्तावावर इंग्लंड क्रिकेट बोर्ड काय निर्णय घेणार हे महत्त्वाचं असणार आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा निर्णय झाल्यानंतर बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट मंडळ यांच्या अधिकाऱ्यांची चर्चा होईल. इंग्लंडने जर हा प्रस्ताव स्विकारला तरच या मालिकेत भारताकडे २-१ अशी आघाडी राहू शकते, अन्यथा ही मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली जाऊ शकते आणि भारताकडे तब्बल १४ वर्षानंतर चालून आलेली मालिका विजयाची संधी जाईल.

इंग्लंड क्रिकेट मंडळानं काय म्हटलं?

भारत-इंग्लंड यांच्यातील सामना कसोटी सामना रद्द झाल्याची माहिती इंग्लंड क्रिकेट मंडळाने एका निवेदनाद्वारे दिली आहे. बीसीसीआयसोबत झालेल्या चर्चेत ओल्ड ट्रॅफोर्ड येथे खेळवला जाणारा सामना रद्द करण्यात आला आहे.

भारतीय क्रिकेट संघाच्या स्टाफमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याची भीती असून, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय संघ आपल्या खेळाडूंची तयार करू शकली नाही, असं इंग्लंड क्रिकेट बोर्डाने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in