विराट कोहली 41, केएल राहुल 94 दिवसांनी खेळणार...तेही थेट पाकिस्तानशी, संघ गोत्यात येणार?

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुल दीर्घकाळानंतर टीम इंडियात परतले आहेत.
विराट कोहली 41, केएल राहुल 94 दिवसांनी खेळणार...तेही थेट पाकिस्तानशी, संघ गोत्यात येणार?

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुल दीर्घकाळानंतर टीम इंडियात परतले आहेत. या महिन्यापासून सुरू होणाऱ्या आशिया चषकासाठी दोघांची टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. राहुलला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. अशा स्थितीत तो जवळपास सर्व सामने खेळणार हे निश्चित झाले आहे.

व्यवस्थापनाचा अजूनही कोहलीवर पूर्ण विश्वास आहे. आशिया कपच्या जवळपास प्रत्येक सामन्यात त्याला संधी मिळू शकते. आशिया चषक स्पर्धेत भारताला 28 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. असा स्थितीत एकही मालिका न खेळता, एकही सराव सामना न खेळता थेट एवढ्या मोठ्या सामन्यासाठी मैदानात उतरणे धोक्याचे ठरेल का? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

शस्त्रक्रियेनंतर केएल राहुल कोरोना पॉझिटिव्ह

मोठी गोष्ट म्हणजे कोहलीला गेल्या पाच महिन्यांपासून एकही आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावता आलेले नाही आणि अडीच वर्षांपासून एकही शतक झळकावता आलेले नाही. तो सातत्याने धावा काढण्यासाठी धडपडताना दिसत आहे. तर केएल राहुलची नुकतीच जर्मनीत मांडीवर शस्त्रक्रिया झाली. यानंतर तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आला. इथे आल्यावर त्याला कोरोना झाला. सध्या तो बरा आहे. पण पाकिस्तानविरुद्धच्या मोठ्या सामन्यात त्याला थेट मैदानात उतरवणे ही मोठी जोखीम ठरु शकते.

केएल राहुलने 25 मे रोजी शेवटचा सामना खेळला होता

केएल राहुल या वर्षी 25 मे रोजी लखनौ सुपर जायंट्स (LSG) साठी कर्णधार म्हणून IPL मध्ये शेवटचा सामना खेळला होता. यामध्ये राहुलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध (RCB) 79 धावांची खेळी खेळली. याआधी झालेल्या सामन्यात राहुलने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध नाबाद 68 धावांची खेळी केली होती. तो फॉर्मात दिसत होता, पण थेट शस्त्रक्रियेनंतर आशिया चषकासारख्या मोठ्या स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणे हा योग्य निर्णय वाटत नाही.

कोहली शेवटचा सामना 17 जुलै रोजी खेळला होता

दुसरीकडे कोहलीने या वर्षी 17 जुलै रोजी मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. त्या सामन्यात त्याने केवळ 17 धावा केल्या होत्या. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यावर कोहलीने 6 आंतरराष्ट्रीय डावात केवळ 76 धावा केल्या होत्या. त्याने एजबॅस्टन कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 11 आणि दुसऱ्या डावात 20 धावा केल्या होत्या.

यानंतर टी-20 मालिकेतील दोन सामन्यांमध्ये त्याला 1 आणि 11 धावाच करता आल्या. यानंतर कोहली एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी करून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देईल असे वाटत होते, पण ही अपेक्षाही फोल ठरली. चाहत्यांच्या अपेक्षा मोडीत काढत त्याने पहिल्या लॉर्ड्स एकदिवसीय सामन्यात 16 धावा केल्या. त्यानंतर मँचेस्टर एकदिवसीय सामन्यात कोहली 17 धावा करून ढेपाळला. आता या वाईट टप्प्यात, दीर्घ विश्रांतीनंतर त्याला थेट मोठ्या सामन्यात नेणे ही मोठी जोखीम ठरु शकते.

आशिया चषक 27 ऑगस्टपासून सुरु होणार

27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत UAE मध्ये होणाऱ्या आशिया कप 2022 मध्ये सहा संघ सहभागी होणार आहेत. श्रीलंका, गतविजेते भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान याआधीच स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. त्याचवेळी पात्रता स्पर्धेनंतर सहावा आणि अंतिम संघ निश्चित केला जाईल. 20 ऑगस्टपासून हाँगकाँग, कुवेत, सिंगापूर आणि यूएईसह सहा संघांच्या पात्रता स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

आशिया कपसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुडा, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.

हे तिन खेळाडू स्टँडबाय

दुसऱ्या ट्विटमध्ये बीसीसीआयने म्हटले की, 'जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीमुळे निवडीसाठी उपलब्ध नव्हते. सध्या ते बंगळुरू येथील एनसीएमध्ये फिटनेस टेस्टला सामोरे जात आहेत. श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चहर या तीन खेळाडूंना स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in