
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाने प्ले-ऑफच्या शर्यतीत आपलं आव्हान कायम राखून ठेवलं आहे. रविवारी मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात चेन्नईने 91 धावांनी दिल्लीवर मात केली.
यंदाच्या हंगामात चेन्नईला प्ले-ऑफची जागा गाठायची असेल तर बरीच मेहनत करावी लागणार आहे. आतापर्यंत झालेल्या 11 सामन्यांत चेन्नईने फक्त 4 सामन्यांत विजय मिळवले आहेत. अशा परिस्थितीत महेंद्रसिंह धोनीने संघाच्या प्ले-ऑफ मधल्या स्थानाबद्दल महत्वाचं विधान केलं आहे.
दिल्लीविरुद्ध सामना झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनीला प्ले-ऑफच्या स्थानाबद्दल विचारलं असता त्याने, जर आम्ही प्ले-ऑफला पात्र झालो तर चांगलंच आहे, पण समजा आम्हाला हे जमलं नाही तर जगाचा अंत होणार नाहीये असं उत्तर दिलं. आतापर्यंत झालेल्या सामन्यात 4 विजय आणि 7 पराभवांमुळे दिल्लीला प्ले-ऑफचं स्थान गाठण्यासाठी उर्वरित सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे यापुढील सर्व सामन्यात चेन्नईला सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे.
"सध्या मी एका क्षणाला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकडे लक्ष देतोय. मी गणिताकडे फारसं लक्ष देत नाही. मी शाळेत असतानाही गणितात चांगला नव्हतो. तुम्ही तुमचं भविष्य स्वतःच्या हाताने लिहीत असता. महत्वाचं हे असतं की तुम्ही प्रत्येक सामन्यात तुमचा सर्वोत्तम खेळ करणं गरजेचं आहे. त्यामुळे हा संघ हरला आणि दुसऱ्या संघाटा रनरेट कमी असेल तर तुम्हाला संधी आहे असा विचार करण्यात काहीच अर्थ नाही. अशाने तुमच्यावर दबाव वाढतो. सामन्यासाठी तयार रहा आणि ठरवलेल्या रणनितीप्रमाणे खेळा."
खेळाडूंनी उर्वरित सामने खेळताना ते एन्जॉय करायला हवेत, प्ले-ऑफचं दडपण घेण्याची काहीच गरज नाही. जर प्ले-ऑफमध्ये संधी मिळाली तर उत्तमच आहे, असंही धोनीने स्पष्ट केलं.