नीरज चोप्रानं घडवला इतिहास! World Championships मध्ये पटकावलं 'रौप्य पदक'

Neeraj chopra made history in World Championships : 88.13 मीटर दूर भालाफेक, नीरज चोप्राची ही कामगिरी का ठरलीये ऐतिहासिक?
olympic champion neeraj chopra in world championship
olympic champion neeraj chopra in world championship

ऑलिम्पिक 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राने पुन्हा एकदा भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. भालाफेकपटू नीरज चोप्राने वर्ल्ड अॅथेलिटिक्स चॅम्पियनशिप २०२२ मध्ये इतिहास घडवला. नीरज चोप्राने रविवारी झालेल्या अंतिम फेरीत ८८.१३ मीटर दूर भाला फिरकावत रौप्य पदक पटकावलं.

नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी

ऑलिम्पिकमध्ये भारताला सुर्वण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राने आणखी एक मोठी कामगिरी केली. रविवारी झालेल्या अंतिम फेरीत नीरज चोप्राने ८८.१३ मीटर भालाफेक करत पदकावर नाव कोरलं. वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भालाफेक खेळात रौप्य पदक जिंकणारा नीरज चोप्रा पहिला खेळाडू ठरला.

अमेरिकेतील युजीन मध्ये झालेल्या चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत नीरज चोप्रासह एकूण १२ खेळाडू होते. नीरज चोप्राचं सुवर्ण पदक थोड्या फरकाने हुकलं. ९० मीटर भालाफेक करणाऱ्या ग्रेनाडाच्या अँडरसनने सुर्वण पदक पटकावलं. भारताचा रोहित यादव १०व्या स्थानी राहिला.

यापूर्वी वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला एकच पदक मिळालेलं आहे. भारताला यापूर्वी लांब उडी खेळ प्रकारात पदक मिळालेलं असून, अंजू बॉबी जॉर्ज यांनी २००३ मध्ये कांस्य पदक जिंकून दिलं होतं. त्यानंतर १९ वर्षानंतर भारताच्या खात्यात दुसरं पदक जमा झालं आहे.

फाऊलने झाली नीरज चोप्राची सुरूवात

वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत नीरज चोप्राची सुरूवात चांगली राहिली नाही. नीरज चोप्राचा पहिला थ्रो फाऊल ठरला. दुसरीकडे ग्रेनाडाच्या अँडरसन पिटर्सने पहिलाच थ्रो ९०.२१ मीटर अंतरावर फेकला. त्यामुळे सुवर्ण जिंकण्यासाठी इतर खेळाडूंना ९० मीटर अंतर गाठावं लागणार हे निश्चित झालं.

नीरज चोप्राने दुसरा थ्रो ८२.३९ मीटर दूर फेकला, तर तिसरा थ्रो ८६.३७ मीटर अंतरापर्यंत पोहोचला. चौथ्या प्रयत्नात नीरज चोप्राने कमाल केली. चौथ्या प्रयत्नात नीरज चोप्राने ८८.१३ मीटर दूर भालाफेक करत रौप्य पदकावर दावा केला. त्यानंतर इतर एकाही खेळाडूला ८८.१३ मीटरवर भालाफेक करण्यात यश आलं नाही, आणि नीरजने पदक पटकावलं.

अँडरसन-नीरज चोप्रामध्ये होती स्पर्धा

जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या भालाफेकपटू अँडरसनने उपांत्य फेरीत ८९.९१ मीटर भालाफेक करत अंतिम फेरीत स्थान मिळवलं होत. तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या नीरज चोप्राने ८८.३९ मीटरवर भालाफेक केली होती. त्यामुळे जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या नीरज चोप्राला अँडरसनला मात देण्यासाठी ९० मीटर भालाफेक करावी लागणार होती, मात्र त्यात तो अपयशी ठरला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in