IPL BLOG: Love him or Hate Him…महेंद्रसिंह धोनी नावाचं अजब रसायन!
आपण प्रत्येकजण शाळेत असताना वर्गात एक मुलगा असायचा…की जो कधीही तुम्हाला सतत २४ तास अभ्यासात बुडालेला दिसायचा नाही. गरजेच्या वेळी अभ्यास, गरजेच्या वेळी खेळ आणि गरजेच्या वेळी दंगामस्ती असं रुटीन फॉलो करुनही हा मुलगा परीक्षेत कायम पहिल्या क्रमांकाच्या शर्यतीत असायचा. अनेकदा अशा मुलांबद्दल इतरांच्या मनात आसूया वजा आकर्षण असतं की हे सगळं याला कसं काय […]
ADVERTISEMENT
आपण प्रत्येकजण शाळेत असताना वर्गात एक मुलगा असायचा…की जो कधीही तुम्हाला सतत २४ तास अभ्यासात बुडालेला दिसायचा नाही. गरजेच्या वेळी अभ्यास, गरजेच्या वेळी खेळ आणि गरजेच्या वेळी दंगामस्ती असं रुटीन फॉलो करुनही हा मुलगा परीक्षेत कायम पहिल्या क्रमांकाच्या शर्यतीत असायचा. अनेकदा अशा मुलांबद्दल इतरांच्या मनात आसूया वजा आकर्षण असतं की हे सगळं याला कसं काय जमतं?? तुम्ही नीट लक्षात घ्या तर तुमच्या शाळेतला तो मुलगा आणि महेंद्रसिंह धोनी याच्यात फारसा फरक नाहीये.
ADVERTISEMENT
आतापर्यंत पार पडलेल्या १४ हंगामांपैकी ९ हंगामात अंतिम फेरीत प्रवेश आणि ४ वेळेला विजेतेपद. ही कामगिरी आहे धोनी नावाच्या अजब रसायनाची. २०२१ च्या आयपीएल हंगामाचं विजेतेपद धोनीने पुन्हा एकदा संघाला मिळवून दिलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं मैदान सोडल्यानंतरही धोनीच्या नावाची चर्चा काहीकेल्या थांबत नाही. आधी आयपीएलच्या निमीत्ताने आणि त्यानंतर आगामी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा मेंटॉर यानिमीत्ताने धोनी अजुनही चर्चेत आहे.
IPL 2021 Final : विजयादशमीला CSK चा खेला होबे, KKR वर मात करत पटकावलं चौथं विजेतेपद
हे वाचलं का?
ज्या पद्धतीने अजुनही धोनीचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत तसेच त्याच्यावर टीका करणारेही भरपूर आहेत. मी स्वतःच्या धोनीच्या बॅटींगचा कधीही चाहता नव्हतो नसेन, परंतू एक विकेटकिपर आणि कॅप्टन म्हणून धोनी सर्वोत्तम आहे. त्याच्या तोडीचं विकेटकिपींग आणि कॅप्टन ज्याची संपूर्ण संघावर मजबूत पकड आहे असा एकही खेळाडू तुम्हाला शोधून सापडणार नाही. त्यामुळे तुम्ही धोनीवर प्रेम करा किंवा त्याच्यावर टीका करा तुम्ही धोनीला नजरअंदाज करु शकतच नाही हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलंय.
IPL 2021 Final : कोणालाही न जमलेला विक्रम धोनीने आज करुन दाखवला
ADVERTISEMENT
१) जबर आत्मविश्वास –
ADVERTISEMENT
धोनीच्या आतापर्यंतच्या आयपीएल करिअरचा आपण आढावा घेतला तर त्याच्या आणि चेन्नईच्या यशामागचं एक महत्वाचं कारण दिसतं ते म्हणजे आपल्या खेळाडूंवर असलेला विश्वास. कितीही खराब कामगिरी झाली तरीही सामना संपल्यानंतर धोनी त्या खेळाडूच्या खांद्यावर हात ठेवून त्याला मोलाचे सल्ले देताना आपण पाहिलं आहे. फार क्वचितच तुम्ही धोनीला रागावलेलं, निराश झालेलं किंवा दमलेलं पाहिलं असेल. २०२० चा हंगाम हा चेन्नईचा सर्वात खडतर आणि वाईट हंगाम. जो संघ नेहमी अंतिम फेरी गाठण्याच्या शर्यतीत असायचा तो संघ पहिल्यांदाच प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. परंतू या हंगामातही जेव्हा धोनीला विचारण्यात आलं की हा तुझा आयपीएलमधला शेवटचा हंगाम आहे का त्याला धोनीने Defiantly Not असं उत्तर दिलं.
या उत्तरमागे कोणताही अहंभाव दिसून आला नाही पण हा हंगाम आम्ही अपयशी ठरलो म्हणून काय झालं?? आम्ही दणक्यात पुनरागमन करु असा विश्वास होता. जेव्हा एखाद्या यशस्वी संघाला जोरदार धक्का बसतो तेव्हा त्यातून धडा घेऊन त्यांनी केलेलं पुनरागमन हे तितकच जोरदार असतं. २०२० च्या हंगामातली खराब कामगिरी, संघात दुही पसरल्याचं वातावरण अशा अनेक नकारात्मक गोष्टींना मागे सारत धोनीने आपल्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर चेन्नईला पुन्हा एकदा विजयाचा कप मिळवून दिला आहे.
२) काळाची पावलं ओळखून योग्य उमेदवारांवर विश्वास –
आयपीएल २०२० मध्ये चेन्नईचं आव्हान हे साखळी फेरीतच संपुष्टात आलं. चेन्नईच्या चाहत्यांसह इतरांसाठीही हा खूप मोठा धक्का होता. बॅटींगमध्ये कमी होत चाललेली आपली जादू, रैनाच्या नाराजीनाट्यानंतर विस्कटलेली घडी आणि दुखापतींचं सत्र यामुळे धोनीचा संघ निराशेच्या गर्तेत सापडला होता. परंतू एक हंगाम गमावल्यानंतरही धोनीने पुढचा विचार करत नवीन हिरा शोधला. महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडवर धोनीने विश्वास दाखवत त्याला सलामीला यायची संधी दिली. शेन वॉटसननंतर तू चेन्नईचा ओपनर असशील हा विश्वास धोनीने ऋतुराजवर दाखवला आणि याच विश्वासाचं फळ दिसायला सुरुवात झाली. आयपीएल २०२० मध्ये अखेरच्या तीन सामन्यांमध्ये ऋतुराजने हाफ सेंच्युरी झळकावत पुढचा हंगाम आपलं वेगळं रुप तुम्हाला पहायला मिळेल हे दाखवून दिलं आणि झालंही तसंच…
यंदाच्या हंगामात ६३५ धावा करत ऋतुराज गायकवाडने ऑरेंज कॅपचा मान मिळवला, ज्यात एका शतकाचाही समावेश होता. महत्वाची गोष्ट म्हणजे ऑरेंज कॅपच्या या शर्यतीत ऋतुराजचा साथीदार फाफ डु-प्लेसिस दुसऱ्या स्थानावर राहिला आणि त्याची संधी ही अवघ्या २ धावांनी हुकली. यावरुनच धोनीने ऋतुराज आणि आपल्या जोडगोळीवर दाखवलेला विश्वास किती योग्य होता हे दिसून येतं.
IPL BLOG: देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी!
सुरेश रैना हा चेन्नईचा हक्काचा मॅचविनर खेळाडू, परंतू या हंगामात अखेरच्या सत्रात धोनीने रैनाऐवजी मोईन अलीवर जास्त विश्वास दाखवला. यासाठी त्याला फॅन्सच्या नाराजीचाही सामना करावा लागला. परंतू मोईन अलीनेही विजयात मोलाचं योगदान देत आपली निवड सिद्ध करुन दाखवली. धोनीच्या कॅप्टन्सीचं हेच यश आहे असं मला वाटतं. वैय्यक्तितरित्या धोनीची बॅटींग ही आता पूर्वीसारखी होत नाही. पण धोनीला विजयाचा फॉर्म्युला माहिती आहे. त्याची सर्व समीकरणं धोनीच्या तोंडपाठ आहेत. त्यामुळे स्टम्पमागे उभा राहून प्रत्येक समीकरण पायरी आणि पायरी सोडवत तो आपल्या संघाकडून चांगली कामगिरी करवून घेतो. कुठेही आक्रस्ताळेपणा नाही, कामगिरी खराब झाल्यानंतर नाराजी नाही…शांत डोक्याने प्रत्येक चाल मैदानात खेळून धोनीने विजय मिळवून देत शेर अभी जिंदा है हे दाखवून दिलं. दुर्दैवाने धोनीचा हाच गूण विराटकडे दिसत नाही.
धोनीच्या कॅप्टन्सीचं कौतुक करताना तुम्हाला खरंतंर शब्द अपुरे पडतील…पण माझ्यामते या सर्व प्रवासात धोनीच्या यशाचं खरं गुपित आहे तो म्हणजे त्याचा आत्मविश्वास आहे. हा आत्मविश्वास फाजील नक्कीच नाही…आपल्यात अजुनही संघाला विजेतेपद मिळवून देण्याची धमक आहे याची जाण धोनीला आहे. म्हणूनच की काय Definitely Not नंतर ट्रॉफी स्विकारताना धोनीने हर्षा भोगले यांना दिलेलं I Still haven’t left behind my legacy हे उत्तर चाहत्यांच्या काळजाला भिडलं आहे. थोडक्यात काय धोनी आणि चेन्नई हे समीकरण आता कायम राहणार आहे. पुढच्या वर्षीही धोनी याच जोमाने मैदानात उतरेल आणि आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्याचे प्रयत्न करेल..आता जबाबदारी बाकीच्या संघांची त्याला थांबवण्याची.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT