सूर्यकुमारला भारतीय संघात स्थान, जाणून घ्या आतापर्यंतचा प्रवास

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या सूर्यकुमार यादवची अखेरीस भारतीय संघात निवड झाली आहे. इंग्लंडविरुद्ध ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी सूर्यकुमारची भारतीय संघात निवड झाली आहे. गेली अनेक वर्ष सूर्यकुमार मुंबईकडून स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतो. युएईत पार पडलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात सूर्यकुमारने बहारदार खेळी करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सूर्यकुमारची भारतीय संघात निवड होईल अशी सर्वांना आशा होती. परंतू निवड समितीने त्यावेळी त्याला संघात स्थान दिलं नाही.

ADVERTISEMENT

परंतू सूर्यकुमारने हार न मानता आपला सराव सुरु ठेवला. अखेरीस त्याच्या खेळाची दखल निवड समितीने घेतली असून इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेत त्याला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. आज आपण सूर्यकुमारच्या करिअरबद्दल जाणून घेणार आहोत…

सूर्यकुमार यादवचं कुटुंब हे मुळचं उत्तर प्रदेशचं, पण त्याचे वडील हे मुंबईतील भाभा अणूउर्जा प्रकल्पात काम करत असल्यामुळे सूर्यकुमार हा नंतर पक्का मुंबईकर झाला. आपल्या मुलाला असलेली क्रिकेटची आवड पाहून सूर्यकुमारच्या वडीलांनी त्याला चेंबूर येथे क्रिकेट सराव शिबीरात दाखल केलं. सुरुवातीला स्थानिक पातळीवर सराव करणाऱ्या सूर्यकुमारने १२ व्या वर्षी माजी खेळाडू दिलीप वेंगसरकर यांच्या अकॅडमीत सरावाला सुरुवात केली. स्थानिक स्पर्धांमध्ये सूर्यकुमारने आपल्या बॅटींगची चमक दाखवली होती, ज्याचा फायदा त्याला पुढे झाला आणि मुंबईच्या वयोगट संघासाठी त्याची निवड झाली.

हे वाचलं का?

२००९ साली सूर्यकुमारने मुंबईकडून पहिल्यांदा विजय हजारे करंडक स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेत सूर्यकुमारने सर्वांना आपल्या कामगिरीने प्रभावित केलं, ज्यानंतर त्याची सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेसाठी संघात निवड झाली. यानंतर सूर्यकुमारच्या प्रगतीचा आलेख असाच वर चढत गेला आणि हळूहळू सूर्यकुमार मुंबईच्या रणजी संघाचा प्रमुख सदस्य बनला. कालांतराने सूर्यकुमारकडे मुंबईच्या संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं.

आयपीएलमध्येही सूर्यकुमारला २०१२ च्या सुमारास संधी मिळाली. मुंबई इंडियन्सने त्याला संघात स्थान दिलं, पण त्यावेळी संघात सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, अंबाती रायुडू असे दिग्गज खेळाडू असल्यामुळे त्याला फारशी संधी मिळाली नाही. अखेरीस २०१४ साली सूर्यकुमारला कोलकाता नाईट रायडर्स संघात संधी मिळाली. यानंतर पुढचे काही हंगाम सूर्यकुमार सातत्याने कोलकाता नाईट रायडर्सकडून चांगली कामगिरी करत होता. २०१५ मध्ये सूर्यकुमारने मुंबई इंडियन्सविरुद्ध २० बॉलमध्ये ४६ रन्स काढून आपल्या संघाला एकहाती सामना जिंकवून दिला.

ADVERTISEMENT

२०१८ मध्ये सूर्यकुमार पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला. २०१८ पासून २०२० पर्यंत सूर्यकुमार यादव आयपीएल असो किंवा स्थानिक क्रिकेट सातत्याने धावांचा रतीब घालतो आहे. युएईमध्येही सूर्यकुमारने रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉकच्या साथीने चांगला खेळ केला. परंतू या कामगिरीनंतरही त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघामध्ये निवड झाली नाही. अखेरीस इंग्लंड दौऱ्यासाठी निवड समितीने त्याला संघात स्थान दिलं आता प्रत्यक्षात सूर्यकुमारला संधी मिळणार का आणि संधी मिळाली तर तो कसा खेळ करेल याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT