SA vs IND : कसोटीवर भारताची पकड मजबूत, तिसऱ्या दिवसाअखेरीस १४६ धावांची आघाडी
दुसऱ्या दिवसाचा संपूर्ण खेळ पावसाने वाया गेल्यानंतरही भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरिअन कसोटी सामन्यात आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. ३२७ धावा पहिल्या डावात केल्यानंतर भारताने मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्याच्या जोरावर आफ्रिकेचा पहिला डाव १९७ धावांत गुंडाळला. यानंतर तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताने मयांक अग्रवालची विकेट गमावत १६ धावांपर्यंत मजल मारली आहे. तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताकडे १४६ धावांची आघाडी असून […]
ADVERTISEMENT

दुसऱ्या दिवसाचा संपूर्ण खेळ पावसाने वाया गेल्यानंतरही भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरिअन कसोटी सामन्यात आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. ३२७ धावा पहिल्या डावात केल्यानंतर भारताने मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्याच्या जोरावर आफ्रिकेचा पहिला डाव १९७ धावांत गुंडाळला. यानंतर तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताने मयांक अग्रवालची विकेट गमावत १६ धावांपर्यंत मजल मारली आहे. तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताकडे १४६ धावांची आघाडी असून चौथ्या दिवसात भारतीय फलंदाजांच्या खेळाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात एन्गिडी आणि रबाडाच्या माऱ्यासमोर भारतीय फलंदाजी कोलमडली. ३ बाद २७२ वरुन तिसऱ्या दिवसाच्या खेळात पहिल्याच सत्रामध्ये भारताचा डाव ३२७ धावांमध्ये आटोपला. लन्गिसानी एन्गिडीने ६ विकेट घेत भारताच्या डावाला खिंडार पाडत आफ्रिकेला दमदार पुनरागमन करुन दिलं. परंतू भारतीय गोलंदाजांनी दमदार मारा करत आफ्रिकन फलंदाजांची पळता भुई थोडी केली.
जसप्रीत बुमराहने कर्णधार डीन एल्गरला स्वस्तात माघारी धाडत आफ्रिकेला पहिला धक्का दिला. यानंतर मोहम्मद शमीने आफ्रिकेला लागोपाठ धक्के देत संघाची अवस्था बिकट करुन टाकली. ४ बाद ३२ अशा कठीण अवस्थेत सापडलेल्या आफ्रिकेला टेंबा बावुमा आणि क्विंटन डी-कॉक यांनी सावरलं. या भागीदारी आफ्रिकेने शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडल्यानंतर डी-कॉक शार्दुल ठाकूरच्या बॉलिंगवर माघारी परतला.
चहानापानाच्या सत्रानंतर आफ्रिकेच्या डावाला पुन्हा एकदा गळती लावण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. शमी-बुमराह आणि ठाकूरने आफ्रिकेच्या शेपटाला झटपट गुंडाळत भारताला पहिल्या डावात १३० धावांची आघाडी मिळवून दिली. भारताकडून मोहम्मद शमीने आफ्रिकेचा निम्मा संघ गारद केला. त्याला जसप्रीत बुमराह आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी २-२ तर मोहम्मद सिराजने १ विकेट घेत चांगली साथ दिली.
अखेरच्या सत्रात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय खेळाडूंनी सावध सुरुवात केली. परंतू पहिल्या डावात अर्धशतक झळकावलेला मयांक अग्रवाल जेन्सनच्या बॉलिंगवर आऊट झाला. यानंतर नाईट वॉचमन शार्दुल ठाकूरने राहुलची उत्तम साथ देत अधिकची पडझड रोखली.