RCB च्या विजयावर विरजण, विजयी मिरवणुकीत भयंकर चेंगराचेंगरीत 11 चाहत्यांचा मृत्यू... नेमकं काय घडलं?
IPL स्पर्धेत 18 वर्षांनंतर RCB ने ट्रॉफी जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी लाखो लोक स्टेडियममध्ये जमलेले असतानाच अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत 11 चाहत्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे.
ADVERTISEMENT

RCB Victory and stampede: बंगळुरू: आयपीएलमधील (IPL) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)च्या विजयाचा जल्लोष साजरा करत असतानाच बंगळुरूमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. त्यामुळे विजयी मिरवणुकीवर आता विरजण पडलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या RCB च्या विजय परेडपूर्वी अचानक चेंगराचेंगरी झाली. स्टेडियमबाहेर प्रचंड गर्दीत चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आता हाती आली आहे.
तब्बल 18 वर्षांनंतर RCB ने IPL ट्रॉफी जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी हजारो लोक स्टेडियममध्ये जमले असताना हा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, गर्दी अचानक स्टेडियमच्या बाहेर आणि आत अनियंत्रित झाली, ज्यामुळे गोंधळ उडाला. त्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला तर डझनभर लोक जखमी झाले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामागे आयोजकांचा निष्काळजीपणा आणि गर्दी नियंत्रणातील त्रुटी असल्याचा संशय आहे. पोलीस प्रशासन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे. मृतांची ओळख अद्याप सार्वजनिक केलेली नाही.
उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार काय म्हणाले?
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी अपघातावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, "मृतांची किंवा जखमींची नेमकी संख्या मी अद्याप निश्चित करू शकत नाही, परंतु मी घटनास्थळी जात आहे."










