भाजप आमदाराच्या गाडीवर जीवघेणा हल्ला, कट रचल्याचा आरोप, तीन पोलीस निलंबित; नेमकं काय घडलं?
Amroha bjp mla rajiv tarara car attack : या घटनेनंतर आमदार राजीव तरारा यांनी अत्यंत गंभीर आरोप करत हा हल्ला म्हणजे कोणताही अपघात नसून एक सुनियोजित षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. त्यांनी असा दावा केला की, त्यांच्या जिवाला धोका निर्माण करण्यासाठीच हा कट रचला गेला होता. विशेष म्हणजे, आरोपींना पोलीस कोठडीत असताना त्यांचे व्हिडिओ बनवून या प्रकरणाला मुद्दाम जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भाजप आमदाराच्या गाडीवर जीवघेणा हल्ला
कट रचल्याचा आरोप
तीन पोलीस निलंबित; नेमकं काय घडलं?
Amroha bjp mla rajiv tarara car attack : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील धनौरा मतदारसंघाचे भाजप आमदार राजीव तरारा यांच्या गाडीवर 22 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. या भीषण घटनेमुळे राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आमदार तरारा हे धनौरा येथून अमरोहाच्या दिशेने जात असताना, वाटेत एका रेल्वे फाटकापाशी त्यांची गाडी थांबलेली होती. याच संधीचा फायदा घेत दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांच्या गाडीवर अचानक दगडफेक सुरू केली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी केवळ गाडीच्या काचा फोडल्या नाहीत, तर आमदारांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या बंदुकधारी सुरक्षारक्षकांचे सरकारी शस्त्र हिसकावून घेण्याचाही प्रयत्न केला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी धाडस दाखवत रोहित आणि प्रदीप नावाच्या दोन आरोपींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
या घटनेनंतर आमदार राजीव तरारा यांनी अत्यंत गंभीर आरोप करत हा हल्ला म्हणजे कोणताही अपघात नसून एक सुनियोजित षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. त्यांनी असा दावा केला की, त्यांच्या जिवाला धोका निर्माण करण्यासाठीच हा कट रचला गेला होता. विशेष म्हणजे, आरोपींना पोलीस कोठडीत असताना त्यांचे व्हिडिओ बनवून या प्रकरणाला मुद्दाम जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. समाजात तेढ निर्माण करून वातावरण खराब करण्याच्या उद्देशाने काही शक्ती यामागे सक्रिय असल्याचे आमदारांचे म्हणणे आहे. या संवेदनशील घटनेची माहिती तातडीने देऊनही पोलीस घटनास्थळी पोहोचायला तब्बल 30 ते 35 मिनिटे उशीर झाल्याने, या प्रकरणातील पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरही त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा : पुणे : बिल्डरच्या फसवणुकीमुळे सेवानिवृत्त अधिकारी नैराश्यात, सातव्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन
आमदारांच्या तक्रारीची आणि सुरक्षेतील त्रुटींची गंभीर दखल घेत अमरोहाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) यांनी मोठी कारवाई केली आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा आणि माहिती मिळूनही उशिरा पोहोचल्याचा ठपका ठेवत एसएसआय सतीश कुमार, कस्बा इंचार्ज जुगल किशोर आणि आरक्षी अंशुल कुमार या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. पोलिसांच्या मते, रोहित आणि प्रदीप या दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून, या प्रकरणाशी संबंधित इतर फरार संशयितांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. मात्र, दुसरीकडे सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात आरोपी रोहितने असा दावा केला आहे की, त्याची दुचाकी आमदारांच्या गाडीला धडकली नव्हती, तरीही त्याला बेदम मारहाण करण्यात आली, ज्यामध्ये त्याचा हात मोडला आहे.










