T20 World Cup : कांगारुंच्या शेपटाचा पाकिस्तानच्या विजयरथात अडसर, ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

साखळी फेरीतल्या पहिल्या सामन्यापासून विजयी सूर गवसललेल्या बाबर आझमच्या पाकिस्तानी संघाचं वर्ल्डकपमधलं आव्हान संपुष्टात आलंय. उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अटीतटीच्या लढतीत पाकिस्तानवर ५ विकेट राखून मात करत अंतिम फेरीचं तिकीट बूक केलं आहे. १७७ धावांचं आव्हान एका क्षणाला अशक्य वाटत असताना स्टॉयनिस आणि वेड यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे काही क्षणांमध्ये सोपं होऊन गेलं. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा संघ न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे.

टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधार अरॉन फिंचने पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. परंतू संपूर्ण स्पर्धेत फॉर्मात असलेल्या मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम या जोडीने पाकिस्तानी डावाची धुँवाधार सुरुवात केली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी करत मैदानात चौफेर फटकेबाजी केली. विशेषकरुन मोहम्मद रिझवानने आक्रमक पवित्रा घेत ऑस्ट्रेलियन बॉलर्सची धुलाई केली. झॅम्पाने बाबर आझमला आऊट करत पाकिस्तानला पहिला धक्का दिला.

यानंतर मैदानावर आलेल्या फखार झमाननेही कांगारुंच्या अडचणी वाढवल्या. मोहम्मद रिझवानची उत्तम साथ देत दोन्ही फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन बॉलर्सवर दडपण कायम ठेवलं. रिझवानने आपली हाफ सेंच्युरी यादरम्यान पूर्ण केली. दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी झाल्यानंतर स्टार्कने रिझवानचा अडसर दूर केला. त्याने ५२ बॉलमध्ये ६७ रन्स केल्या. यानंतर आसिफ अली आणि शोएब मलिक यांना स्वस्तात माघारी धाडवण्यात ऑस्ट्रेलियाला यश आलं. परंतू फखार झमानने अखेरपर्यंत मैदानात तग धरत फटकेबाजी करुन आपलं अर्धशतक साजरं केलं. यादरम्यान फखारने पाकिस्तानला १७६ धावांपर्यंत मजल मारुन दिली. फखारने नाबाद ५५ धावांची इनिंग खेळताना ३ चौकार आणि ४ षटकार लगावले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात निराशाजनक झाली. शाहीन शाह आफ्रिदीच्या बॉलिंगवर पहिल्याच ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच शून्यावर माघारी परतला. यानंतर मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर यांनी दुसऱ्या विकेटसाठी छोटेखानी भागीदारी करुन कांगारुंचा डाव सावरला. ही जोडी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरणार असं वाटत असतानाच मार्श शादाब खानच्या फिरकीचा बळी ठरला. यानंतर मैदानावर आलेला स्टिव्ह स्मिथ दुर्दैवाने आवश्यक त्या धावगतीने रन्स काढू शकला नाही.

स्टिव्ह स्मिथ माघारी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियन डावाला गळती लागली. डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल हे फटकेबाजी करण्याच्या नादात माघारी परतले. डेव्हिड वॉर्नर शादाब खानच्या बॉलिंगवर कॅच आऊट झाला, परंतू अल्ट्रा एजमध्ये बॉल वॉर्नरच्या बॅटला लागलेला दिसत नव्हता. यानंतर मार्कस स्टॉयनिस आणि मॅथ्यू वेड यांनी अखेरच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करत अखेरच्या दोन ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २२ धावांचं आव्हान आणून ठेवलं.

ADVERTISEMENT

शाहीन शाह आफ्रिदीने १९ व्या षटकात टिच्चून मारा करत ऑस्ट्रेलियावर दडपण आणलं. परंतू मोक्याच्या क्षणांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंनी केलेल्या काही चुकांमुळे सामन्यात आणखीनच रंगत निर्माण केली. मॅथ्यू वेडने आफ्रिदीच्या अखेरच्या तीन बॉलवर ३ खणखणीत षटकार खेचत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT