पुणे : एकतर्फी प्रेमातून कबड्डीपटू तरुणीला कोयता अन् चाकूने 22 वार करुन संपवलं, आरोपीला जन्मठेप
Pune Crime : एकतर्फी प्रेमातून 15 वर्षीय राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडू मुलीवर कोयता आणि चाकूने 22 वार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीविरोधात मंगळवारी निकाल देण्यात आला. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा निर्णय जाहीर केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
एकतर्फी प्रेमातून कबड्डीपटू तरुणीला कोयता अन् चाकूने 22 वार करुन संपवलं
आरोपी हा तरुणीच्या नात्यातील असून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीये.
Pune Crime : पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात घडलेल्या धक्कादायक हत्याकांड प्रकरणात न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. एकतर्फी प्रेमातून 15 वर्षीय राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडू मुलीवर कोयता आणि चाकूने 22 वार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीविरोधात मंगळवारी निकाल देण्यात आला. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा निर्णय जाहीर केला. या घटनेनंतर तब्बल चार वर्षांनी पीडित कुटुंबीयांना न्याय मिळाला आहे.
या प्रकरणातील आरोपी शुभम ऊर्फ ऋषिकेश बाजीराव भागवत याने 12 ऑक्टोबर 2021 रोजी बिबवेवाडीतील एका लॉन्समध्ये ही घटना घडवली होती. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने अत्यंत क्रूरपणे मुलीवर वार करून तिची हत्या केली होती. शवविच्छेदन अहवालात मृतदेहावर एकूण 25 जखमा आढळून आल्या होत्या, ज्यामुळे हत्येची भीषणता स्पष्ट झाली होती.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. हेमंत झंजाड यांनी जोरदार युक्तिवाद केला. आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत अमानुष आणि समाजाला हादरवणारा असल्याने त्याला मृत्युदंड देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली होती. समाजात कठोर संदेश जावा आणि अशा प्रवृत्तीला आळा बसावा, यासाठी फाशीची शिक्षा योग्य ठरेल, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने मांडला. यासाठी साक्षीदारांच्या साक्षींसह उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा आधारही सादर करण्यात आला होता.
दुसरीकडे, न्यायालयाने सरकारी तसेच बचाव पक्षाचे सर्व युक्तिवाद सखोलपणे ऐकून घेतले. हा गुन्हा अत्यंत गंभीर आणि क्रूर स्वरूपाचा असला तरी तो ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ प्रकरणांच्या चौकटीत मोडतो का, याचा विचार करण्यात आला. भारतीय दंड विधानाच्या कलम 302 अंतर्गत आरोपी दोषी ठरवण्यात आला. या कलमानुसार मृत्युदंड किंवा जन्मठेप अशी दोनच शिक्षांची तरतूद आहे.










