अमरावती : मुलाशी होते जुने वैमनस्य, सुपारी देऊन त्याच्या वडिलांचा खून; धक्कादायक कारण समोर
Amravati Crime : या हत्येप्रकरणी मृताचे पुत्र विनीत वानखडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तीन वर्षांपूर्वी विनीतचा सुशील ढोले याच्याशी मुलीच्या कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर विनीतच्या एका मित्राकडून सुशीलवर हल्ला झाला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अमरावती : मुलीच्या कारणाने दोघांमध्ये जुने वैर होते
पण सुपारी देऊन त्याच्या वडिलांचा केला खून
Amravati Crime : अमरावती शहरातील भाजी बाजार चौक परिसरात सोमवारी रात्री घडलेल्या खूनप्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. मुलीच्या कारणावरून सुरू असलेल्या जुन्या वैमनस्यातून थेट सुपारी देऊन हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने चार संशयितांना मंगळवारी सकाळी भुसावळ येथून ताब्यात घेऊन खोलापुरी गेट पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
सोमवारी रात्री सुमारे 8 च्या सुमारास भाजी बाजार चौकात पवन पंजाबराव वानखडे (वय 45) यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. गळा, पोटावर झालेल्या गंभीर वारांमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपासाला गती दिली.
या हत्येप्रकरणी मृताचे पुत्र विनीत वानखडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तीन वर्षांपूर्वी विनीतचा सुशील ढोले याच्याशी मुलीच्या कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर विनीतच्या एका मित्राकडून सुशीलवर हल्ला झाला होता. त्या प्रकरणात विनीतलाही तीन महिने कारागृहात जावे लागले होते. तुरुंगातून सुटल्यानंतरही शुभम ढोले आणि सुशील ढोले हे विनीतला सातत्याने धमक्या देत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, 14 डिसेंबर रोजी रात्री सुमारे 2 च्या सुमारास वैभव पत्रे आणि साहिल हिरपूरकर हे विनीतच्या घरी आले होते. त्यांनी त्याच्याकडे 20 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर 15 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:20 च्या सुमारास वैभवने फोन करून पैसे न दिल्यास तुला आणि तुझ्या वडिलांना ठार मारण्याची धमकी दिल्याचे विनीतने पोलिसांना सांगितले आहे.










