mumbai tak baithak dr navneet mandhani on numerology politics : अंकशास्त्राविषयी लोकांमध्ये वाढत चाललेली उत्सुकता, त्यामागील तर्क, राजकारणातील आकड्यांचे महत्त्व आणि भविष्यविषयक अंदाज या विषयांवर मुंबई Tak बैठकीत आयोजित विशेष सत्रात डॉ. नवनीत मानधनी यांनी सविस्तर संवाद साधला. या चर्चेत त्यांनी अंकशास्त्र, हस्ताक्षर, सही, नाव आणि त्यांचा व्यक्तीच्या आयुष्याशी असलेला संबंध यावर आपली भूमिका मांडली. तसेच अंकशास्त्र हे अंधश्रद्धा नसून अभ्यास आणि संशोधनावर आधारित विषय असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र कोणत्याही ज्योतिषशास्त्राच्या किंवा अंकशास्त्राच्या आहारी न जाता त्याचा केवळ मार्गदर्शनासाठी उपयोग करावा, असा स्पष्ट सल्लाही त्यांनी यावेळी दिला. कष्टाला पर्याय नसल्याचे सांगताना योग्य दिशेने मेहनत केल्यास अधिक चांगले परिणाम मिळू शकतात, असे ते म्हणाले. चांगला काळ असेल तर अधिक मेहनत करावी आणि प्रतिकूल काळ असेल तर स्वतःला व कुटुंबाला वेळ देऊन नुकसान कमी करण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी नमूद केले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : पुण्याची गोष्ट: पावसामुळे कर्मचाऱ्याने रजा मागितली, मॅनेजरनं थेट नाकारली; स्क्रीनशॉट व्हायरल
भारताबाहेरील विविध देशांमध्येही या विषयावर संशोधन
या संवादादरम्यान श्रद्धा आणि अंधश्रद्धा यावरील प्रश्नालाही त्यांनी उत्तर दिले. काही विशिष्ट व्यक्तींच्या जन्मतारखा, नावांचे अंक आणि त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा संदर्भ देत त्यांनी अंकशास्त्रातील निरीक्षणे मांडली. एकाच दिवशी जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य वेगळे का असते, या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी प्रारब्धाबरोबरच नावाची स्पेलिंग आणि त्यातून तयार होणारे अंकही महत्त्वाची भूमिका बजावतात, असे सांगितले. जुळ्या मुलांचे उदाहरण देत जन्मवेळ, नाव आणि पालकांच्या कर्मांचा प्रभाव यावरही त्यांनी आपले मत व्यक्त केले. भारताबाहेरील विविध देशांमध्येही या विषयावर मोठ्या प्रमाणात संशोधन झाल्याचा दावा करत आपण संशोधनाच्या आधारे बोलत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुलांक आणि भाग्यांक यातील फरक समजावून सांगताना जन्मतारीख व्यक्तिमत्त्व दर्शवते, तर पूर्ण जन्मतारीखेची बेरीज व्यक्तीचा व्यवसाय, आर्थिक प्रगती आणि ओळख ठरवते, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : Personal Finance: स्वतःचं नवं घर घेण्यासाठी 'या' फॉर्म्युल्याने ठरवा डाऊन पेमेंटचा जबरा प्लॅन
2029 च्या राजकीय घडामोडींवर बोलताना भाजपला संधी अधिक असल्याचे मत
चर्चेदरम्यान डॉ. मानधनी यांनी एक ते नऊ या अंकांनुसार व्यक्तींचे स्वभाव, गुण-दोष आणि परस्पर जुळणारे किंवा न जुळणारे अंक याबाबत माहिती दिली. तसेच अनेक राजकीय नेत्यांच्या जन्मतारखा आणि अंकांच्या आधारे त्यांनी त्यांचे गुणधर्म स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. सही आणि अंकशास्त्र यांचा संबंध स्पष्ट करताना व्यक्तीच्या स्वाक्षरीतून त्याचा स्वभाव, निर्णयक्षमता आणि नेतृत्वशैलीबाबत निरीक्षण करता येते, असे त्यांनी सांगितले. विविध नेत्यांच्या स्वाक्षऱ्यांचे उदाहरण देत त्यांनी त्यामधील वैशिष्ट्यांवर भाष्य केले. याचवेळी महाराष्ट्रातील भविष्यातील राजकीय नेतृत्वाविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीकांत शिंदे हे भविष्यातील आश्वासक मुख्यमंत्री ठरू शकतात, असे भाकीत त्यांनी केले. तसेच 2029 च्या राजकीय घडामोडींवर बोलताना भाजपला संधी अधिक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले, मात्र पुढील पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी नसतील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना संधी मिळू शकते, असेही त्यांनी या चर्चेत म्हटले.
नाव, सही आणि पक्षचिन्हांचा परिणाम यावरही या सत्रात चर्चा झाली. व्यक्तीचे किंवा शहराचे नाव बदलल्याने त्याचा प्रभाव पडू शकतो, असे सांगताना त्यांनी पुणे आणि मुंबईच्या नावांचा संदर्भ दिला. योग्य पद्धतीने नाव बदलल्यास सकारात्मक परिणाम मिळू शकतात, तर चुकीच्या पद्धतीने बदल केल्यास नुकसान होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले. स्वतःच्या कंपनीचे नाव बदलल्यानंतर नफ्यात वाढ झाल्याचा अनुभवही त्यांनी सांगितला. अंकशास्त्राच्या आधारे आत्महत्या आणि घटस्फोट टाळण्यास मदत झाल्याचा दावा करत त्यांनी हा विषय केवळ मार्गदर्शनासाठी वापरण्याचे आवाहन केले. शेवटी विविध राजकीय पक्षांच्या चिन्हांवर भाष्य करत काँग्रेस, भाजप आणि धनुष्यबाण या चिन्हांविषयी आपली निरीक्षणे मांडली. कोणत्याही गोष्टीवर अंधविश्वास न ठेवता योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यावेत, असा संदेश देत त्यांनी संवादाचा समारोप केला.
ADVERTISEMENT












