Lalbaugcha Raja Visarjan LIVE: मुंबई: मुंबईतील लालबागचा राजा हा गणपती ‘नवसाला पावणारा’ म्हणून प्रसिद्ध आहे. १९३४ मध्ये स्थापन झालेल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा ९२ वे वर्ष साजरे केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनंत चतुर्दशीला लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक भव्यदिव्य स्वरूपात सुरू आहे.
ADVERTISEMENT
मिरवणुकीची सुरुवात आणि मार्ग:
लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक 6 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता लालबाग मार्केट येथून सुरू झाली. यापूर्वी पहाटे 9.30 वाजता मंडळात विधिवत पूजा आणि आरती पार पडली. मिरवणुकीच्या तयारीसाठी गुरुवारी (4 सप्टेंबर) रात्री 12 वाजता चरणस्पर्श रांग आणि शुक्रवारी (5 सप्टेंबर) रात्री 12 वाजता मुखदर्शन रांग बंद करण्यात आल्या होत्या.
हे ही वाचा>> गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था! 17,000 हून अधिक पोलीस तैनात...
मिरवणूक लालबाग मार्केटपासून सुरू होऊन भारतमाता सिनेमा, चिंचपोकळी पूल, भायखळा रेल्वे स्थानक, क्लेअर रोड, नागपाडा, डंकन रोड, कुंभारवाडा, सुतार गल्ली, माधवबाग, सी.पी. टँक, व्ही.पी. रोड आणि ऑपेरा हाऊस मार्गे गिरगाव चौपाटीवर पोहोचेल. ही मिरवणूक सुमारे 20 ते 23 तास चालते.
भक्तांचा उत्साह
लाखो भाविकांनी लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी प्रचंड गर्दी केली आहे. पारंपरिक कोळी नृत्य, ढोल-ताशांचा गजर आणि लेझीम पथकांनी मिरवणुकीला शोभा आणली. भाविक “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा जयघोषात बाप्पाला निरोप देत आहेत.
मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस आणि महानगरपालिकेने या मिरवणुकीसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मुंबईत गिरगाव चौपाटीसह विविध चौपाट्यांवर विसर्जन पार पडतं.
हे ही वाचा>> Pune: ‘श्री गणेश रत्न रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची विसर्जन मिरवणूक
मुंबईत लालबागच्या राजासह गणेश गल्लीचा मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि तेजुकाया गणेशोत्सव मंडळाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला प्रचंड गर्दी दरवर्षी पाहायला मिळते.
पावसाचे आव्हान
मुंबईत सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे विसर्जन मिरवणुकीत काही अडथळे येत आहेत. मात्र, तरीही गणेश मंडळं आणि भक्तांचा उत्साह मात्र तसूभरही कमी झालेला नाही.
सुरक्षा आणि धमकीचा तणाव:
यंदा विसर्जनादरम्यान मुंबईत दहशतवादी हल्ला कऱण्याची धमकी वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲपवर प्राप्त झाली होती. या धमकीचा तपास करताना नोएडा येथे एका आरोपीला अटक करण्यात आली. या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला, परंतु पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली.
पाहा लालबागच्या राजाची LIVE विसर्जन मिरवणूक
ADVERTISEMENT
