Marine Drive Accident :मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात आज (दि.26) पहाटे एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघात घडलाय. सिग्नल क्रॉस करत असलेल्या एका पादचाऱ्यास दुचाकीस्वाराने उडवल्याने झालेल्या या अपघातामध्ये एकूण तीन जणांना आपला जीव गमवावा लागलाय. पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतांमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाचा, एका तरुणाचा आणि एका तरुणीचा समावेश आहे. पहाटेच्या वेळी एन. एस रोड उत्तर वाहिनी पारशी गेट समोर रस्ते मोकळे असताना हा भीषण प्रसंग ओढवला. या घटनेमुळे मुंबईतील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून मृतांच्या ओळखीबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
पहाटे 5 : 45 च्या सुमारास झाला भीषण प्रसंग
हा अपघात पहाटे 5 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास झाला. मरीन ड्राईव्ह रोडवरील ही धडक इतकी जोरदार होती की त्याचा आवाज परिसरात दूरवर ऐकू आला. अपघातात वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, वाहनांची दुरवस्था पाहून अपघाताच्या भीषणतेचा अंदाज लावला जाऊ शकतो. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेऊन मदतकार्य सुरू केले, मात्र तोपर्यंत मोठा अनर्थ घडला होता.
तिघांचा जागीच अंत आणि वाहनांचे मोठे नुकसान
अपघाताची तीव्रता इतकी प्रचंड होती की, तिन्ही व्यक्तींना सावरण्याची संधीही मिळाली नाही. ज्येष्ठ नागरिक आणि तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर तात्काळ रुग्णवाहिका बोलावण्यात आली होती, परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. वाहनांचे झालेले नुकसान पाहता, हा अपघात ओव्हर स्पिडिंगमुळे झाला असावा असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून रस्त्यावरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती.
पोलीस तपासाला वेग आणि मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क
पोलीस सध्या मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे मरीन ड्राईव्ह परिसरात सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











