Mumbai Bhandup best bus accident : मुंबईच्या भांडुप पश्चिम भागात सोमवारी (ता. 29) रात्री घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. स्टेशन रोडसारख्या गजबजलेल्या ठिकाणी बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने अचानक रस्त्यावर असलेल्या नागरिकांना चिरडल्याने चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दहा जण जखमी झाले. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आणि काही क्षणांतच परिसरात गोंधळ, भीती आणि हाहाकार माजला.
ADVERTISEMENT
प्राप्त माहितीनुसार, भांडुप पश्चिम स्टेशन रोडवर बस मागे घेत असताना चालकाचा ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली. आकाराने मोठी असलेली इलेक्ट्रिक बस अचानक वेगात मागे गेल्याने रस्त्याच्या कडेला चालणारे तसेच उभे असलेले नागरिक बसखाली सापडले. एकूण 13 जण या अपघातात उडवले गेले. त्यापैकी चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित जखमींना तातडीने विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तातडीने राजावाडी, एम. टी. अग्रवाल, सायन, फोर्टिस, हिरा मोंगी आणि मिनाझ रुग्णालयांत उपचारासाठी हलवण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सुरुवातीला सांगण्यात येत होते, मात्र सध्या बहुतेक जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. एका जखमीला उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या नागरिकांमध्ये प्रणिता संदीप रासम, वर्षा सावंत, मानसी मेघश्याम गुरव आणि प्रशांत शिंदे यांचा समावेश आहे. जखमींमध्ये नारायण कांबळे, मंगेश धुखंडे, ज्योती शिर्के, शीतल हाडवे (अल्पवयीन), रामदास रूपे, प्रताप कोरपे, रवींद्र घाडीगावकर, दिनेश सावंत आणि पूर्वा रासम यांचा समावेश असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
पोलिस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर बसचालकाला तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून घटनेचा सखोल तपास सुरू आहे. बस मागे घेताना आवश्यक खबरदारी न घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. फुटेजमध्ये रस्त्याच्या कडेला उभे असलेले नागरिक अचानक बस मागे येताना दिसत असून, जीव वाचवण्यासाठी लोक पळापळ करताना स्पष्टपणे दिसत आहे. एका कपड्यांच्या दुकानात लावलेल्या कॅमेऱ्यात बसच्या चाकाखाली एक व्यक्ती चिरडल्याचा थरारक क्षण कैद झाला आहे.
या घटनेमुळे भांडुप परिसरात शोककळा पसरली असून, वाहतूक सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अशा दुर्घटना टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षिततेकडे अधिक लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अखेर किशोरी पेडणेकरांना उमेदवारी जाहीर, हातातील एबी फॉर्म दाखवत मातोश्रीबाहेर येऊन दिली पहिली प्रतिक्रिया
ADVERTISEMENT











